Maharashtra ST Bus : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने लालपरीच रुप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत लवकरच मोठे बदल होणार असून, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, एसटी महामंडळाच्या सर्व बसेस हळूहळू अपारंपरिक इंधनावर रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे इंधन खर्चात बचत होणार असून, प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येणार आहे. राज्यातील एसटी महामंडळासाठी तब्बल ५१५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची योजना आखण्यात आली आहे. यापैकी ४५० बसेस आधीच खरेदी करण्यात आल्या असून, उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने मार्गावर आणल्या जातील.
शिवाय, सध्या सुरू असलेल्या बसेस एलएनजीवर चालवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. एलएनजी पुरवठ्यासाठी सरकारने करार केला असून, त्याअंतर्गत भविष्यात एसटीची सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यासोबतच, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून शासन विशेष प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा प्रदूषणमुक्त करण्यावर भर दिला जात आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात ३० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या ईव्ही वाहनांवर ६ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, हा कर मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील रस्त्यांवर जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस दिसाव्यात, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. तसेच, सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे नियोजन असून, आमदारांना दिल्या जाणाऱ्या वाहन कर्जावरील व्याज सवलती फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच लागू राहतील.
मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांचे वाहनही ईव्हीवर बदलेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या निर्णयामुळे भविष्यात एसटी सेवा अधिक पर्यावरणपूरक आणि खर्चसवलतीची होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.