Maharashtra State Employee : केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे. मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवण्यात आला.
आधी केंद्रिय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र या वाढीनंतर हा भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला.

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली.
दरम्यान, आता महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबत आज सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.
महागाई भत्ता किती वाढला ?
महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला आहे.
या कर्मचाऱ्यांना आधी 53 टक्के इतका महागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये दोन टक्के वाढ करणे प्रस्तावित होते. यानुसार आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला असून याचा जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.
15 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग होईल.
किती महिन्यांचा महागाई भत्ता फरक मिळणार?
या कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. मे महिन्याच्या पगारासोबत या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि 4 महिन्याचा महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेच अखिल भारतीय सेवेतील या संबंधित कर्मचाऱ्यांच्या हातात जून महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.