Maharashtra State Employee : फडणवीस सरकारकडून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना हक्काचे घर उपलब्ध होणार असून ही घरे म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या शेती महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे शेती महामंडळाच्या 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागणार असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

कर्मचारी संघटनांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत सुद्धा केले आहे. दरम्यान आज आपण फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका कसा आहे? हा निर्णय घेण्याचे कारण नेमके काय? याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सरकारने घेतलेला निर्णय नेमका काय ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 27 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या महामंडळाच्या संचालक मंडळाची ही 327 वी बैठक होती. दरम्यान, याच बैठकीत शेती महामंडळाच्या राज्यभरातील 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीत कर्मचाऱ्यांना राहण्यायोग्य घरे म्हाडाकडून बांधून देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
निर्णय घेण्याचे कारण काय?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती महामंडळाच्या सुमारे 22 हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका बांधून दिल्या जाणार आहेत आणि या सदनिका म्हाडाकडून विकसित होतील.
खरंतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना गिरणी कामगारांप्रमाणे म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून बावनकुळे यांनी यावेळी असे सांगितले आहे की राज्यात शेती महामंडळाच्या 14 शेतमळ्यांवर 2 हजार 966 निवासस्थाने आहेत.
यापैकी 1786 निवासस्थाने राहण्यास अयोग्य असून हीच निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव होता. महामंडळाने या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, यावर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून ही चर्चा करताना महसूलमंत्री यांनी
शेती महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या माध्यमातून चांगली घरे उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. नक्कीच सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांना आपल्या हक्काच्या घराची लॉटरी लागणार आहे असं आपण म्हणू शकतो.