महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! शिक्षण विभागाच्या नव्या आदेशाने शालेय विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Maharashtra Teachers : महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आता एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाकडून या संदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

नव्या आदेशानुसार आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अंगणवाडीतल्या बालकांना सुद्धा शिकवावे लागणार आहे. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या नव्या निर्णयानुसार आता राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता अंगणवाडीतही अध्यापन व मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

या निर्णयाचा राज्यातील बालकांना अगदी अंगणवाडी पासूनच शिक्षणाची गोडी लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले असून, आज आपण याच परिपत्रकाविषयी माहिती पाहणार आहोत.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्राथमिक शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीसाठी द्यावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण यांमधील दरी कमी होण्यास मदत होणार आहे.

या आदेशानुसार प्राथमिक शिक्षक आपल्या शाळेच्या एक किलोमीटर परिघातील अंगणवाड्यांमध्ये जाऊन तेथील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करतील.

विशेषत: पहिलीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी अधिक असणार आहे. पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयांवर लक्ष केंद्रित करून मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी (पूर्व प्राथमिक) आणि पहिलीचा वर्ग हे एका शैक्षणिक स्तरावर आणण्यात येणार आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना शाळेच्या वातावरणाची सवय व्हावी, त्यांचा भाषिक, बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘आकार’ अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आवश्यक धडे व उपक्रमांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक मदत घ्यावी लागणार आहे.

याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांतील १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारखे राष्ट्रीय सण, स्नेहसंमेलने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अंगणवाडीतील मुलांनाही सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर वयोगटानुसार आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करून शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मुलांना दिले जाईल. त्यानंतरच त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांचा प्राथमिक शिक्षणासाठीचा पाया मजबूत होईल, तसेच प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्यासही मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.