Mahayuti Sarkar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच मतदारसंघातील लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आता प्रचारालाही सुरुवात झाली आहे.
दोन्ही गटाचे नेते आता प्रचाराला लागले आहेत. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिंदे गटाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
काल कोल्हापूरात महायुतीची संयुक्त सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये 10 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात.
यामध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रकमेत तीन हजार रुपयांची म्हणजेच ही रक्कम 12000 रुपयांवरून 15000 रुपये करण्याची तसेच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये एवढे आर्थिक सहाय्य देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
याशिवाय इतरही आठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येत्या काही दिवसात आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
मात्र तत्पूर्वी महायुती मधील शिंदे गटाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये दहा मोठ्या घोषणा झाल्या आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘आजची ही सभा खूपच ऐतिहासिक असून 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला होता आणि इतिहास घडवला होता.
आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत दहा मोठ्या घोषणा केल्यात.
मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या 10 मोठ्या घोषणा
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्यात. आपल्या वचननाम्यात शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचे पैसे बारा हजारावरून पंधरा हजार करण्याचे अन एम एस पी वर 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली.
2) महिला सुरक्षा साठी 25000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट केले जाईल आणि लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशे वरून एकशे रुपये केले जातील अशी ही घोषणा करण्यात आली.
3) वृद्ध पेन्शन धारकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात देखील सहाशे रुपयांची वाढ होईल म्हणजेच हे अनुदान पंधराशे वरून 2100 रुपये केले जाईल अशी घोषणा ही झाली.
4) राज्यातील प्रत्येक गरीब व्यक्तीला अन्न आणि निवारा देण्याचे वचन यावेळी जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील असे वचनही शिंदे सरकारने दिले आहे.
6) महाराष्ट्रातील 45000 गावांमध्ये पानंद रस्ते बांधले जातील अशी घोषणा झाली आहे.
7) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाईल.
8) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र 2029 100 दिवसांच्या आत सादर होणार.
9)अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15000 रुपये वेतन देऊ आणि सुरक्षा कवच सुद्धा प्रदान करू असे वचन देण्यात आले आहे.
10) महाराष्ट्रात 25 लाख रोजगार निर्मिती करून तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून दहा हजार रुपयांचे विद्यावेतन मिळेल अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे.