Mhada News : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता इथे घर खरेदीसाठी म्हाडावर अवलंबून असल्याचे दिसते.
म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून दिली जात आहेत. म्हाडाच्या विविध मंडळांकडून दरवर्षी लॉटरी काढली जाते. मात्र यावर्षी माडाच्या मुंबई मंडळाकडून लॉटरी जाहीर करण्यात आली नाही.

यामुळे मुंबईत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या माध्यमातून म्हाडा 2026 मध्ये लॉटरी जाहीर करणार की नाही ? असा सवाल उपस्थित केला जातो आणि दरम्यान आता याचबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
म्हाडा मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाची पुढील लॉटरी नेमकी कधी निघणार? या संदर्भात प्राधिकरणाकडून काही महत्त्वपूर्ण डिटेल समोर आली आहे.
कोकण मंडळाची लॉटरी कधी निघणार?
2026 ठाणे व आजूबाजूच्या परिसरात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या सोडतीत जवळपास दोन हजाराहून अधिक घरांचा समावेश राहणार आहे. दरम्यान या सोडतीसाठी कोकण मंडळाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. विविध प्रकल्पांतील उपलब्ध आणि नव्याने मिळणाऱ्या घरांची शोधाशोध सध्या सुरू आहे.
आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या सोडतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीतील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. या वर्षातील सोडतीतही या योजनेतील घरांनाच सर्वाधिक मागणी होती. मात्र मंडळाच्या गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
प्रकल्पांचे ठिकाण, घरांच्या किंमती आणि इतर कारणांमुळे इच्छुक या घरांकडे पाठ फिरवत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. परिणामी, अशी घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत टाकून विक्री करण्याचे नियोजन मंडळाचे आहे.
या वर्षीच्या सोडतीतील सुमारे 1300 हून अधिक घरे विजेत्यांनी परत केलीत. त्यात म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या फार मोठी आहे. ही घरे आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना देण्यात येणार असून,
त्यानंतर शिल्लक राहणारी तसेच नव्याने उपलब्ध होणारी घरे एकत्र करून पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातील अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाणे व आसपासच्या परिसरात म्हाडामार्फत घर घेण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी ही सोडत महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबई मंडळाची लॉटरी कधी?
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीकडेही इच्छुकांचे लक्ष आहे. या वर्षी सोडत न निघाल्याने सध्या अनेक जण मुंबई मंडळावर नाराज आहेत. पण कोकण मंडळापाठोपाठ मुंबई मंडळ पण पुढील वर्षी लॉटरी साठी तयारी करणार आहे. मार्च 2026 मध्ये मुंबई मंडळ हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याची शक्यता आहे.
स्वतः म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे. पण अजूनही पुढील लॉटरीसाठी मंडळाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने याबाबत अजूनही शंका आहे. यामुळे मुंबई मंडळाची लॉटरी नेमकी कधी निघणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.