Mhada News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत अलीकडे घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणून मुंबईमधील प्राईम लोकेशनवर घर घेणे म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. मात्र आपल्या मुंबईत हक्काचे घर असावे असे स्वप्न मुंबईत राहणाऱ्या असंख्य मराठी माणसांनी पाहिले आहे.
दरम्यान आता या स्वप्नांना बळ देण्यासाठी म्हाडाने एक पाऊल टाकले आहे. खरंतर, मुंबईकर आपल्या आवडत्या ठिकाणी हक्काचा आशियाना उभा करण्यासाठी म्हाडाकडे मोठ्या आशेने बघतात.

परवडणाऱ्या किमतींमध्ये म्हाडा कडून सातत्याने घरांची उपलब्धता करून दिली जात आहे आणि आता म्हाडा प्राधिकरण पुन्हा एकदा मुंबईत हजारो घरे सर्वसामान्यांसाठी विकसित करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील 5 ठिकाणच्या म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी बांधकाम आणि विकास संस्था नेमण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सध्या या ठिकाणी जे हजारो नागरिक राहत आहेत त्यांना अधिक प्रशस्त आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत.
यासोबतच या पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून म्हाडा प्राधिकरणाला जवळपास दहा ते बारा हजार नवीन घरे मिळतील आणि ही घरे लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्री करिता उपलब्ध करून दिली जातील अशी सुद्धा माहिती मीडिया रिपोर्ट मधून हाती आली आहे.
काय आहेत डिटेल्स?
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर वरळी, अभ्युदयनगर, कामाठीपुरा, जीटीबीनगर आणि मोतीलालनगर येथील वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून आगामी चार-पाच वर्षात म्हाडाला हजारो घरांची प्राप्ती होणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने म्हाडाच्या ताब्यातील वसाहती आणि उपकरप्राप्त इमारतींचा (विशेषतः कामाठीपुरा आणि जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासित वसाहतींचा) एकत्रित पुनर्विकास करण्याच्या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी सुद्धा दिली आहे.
या सदरील प्रकल्पानुसार, मोतीलालनगर व जीटीबीनगरमधील सिंधी वसाहतींसाठी बांधकाम संस्था नेमण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी संबंधितांकडून समोर आली आहे.
तसेच, कामाठीपुरा आणि अभ्युदयनगर यासाठी अशाच एजन्सींची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशी सुद्धा महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या पाच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी किती घर उपलब्ध होऊ शकतात याची माहिती जाणून घेऊयात.
कोणत्या लोकेशनवर किती घर?
जिटीबीनगर : या ठिकाणी म्हाडा प्राधिकरणाला पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून 700 ते 800 नवीन घरे मिळणार आहेत. म्हणजेच भविष्यात या घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाईल.
मोतीलाल नगर : पुनर्विकास योजनेतून म्हाडाला मोतीलाल नगर येथून सर्वाधिक घरांची प्राप्ती होणार आहे. या ठिकाणी म्हाडा प्राधिकरणाला तब्बल सात ते आठ हजार नवीन घरे मिळणार आहेत.
कामाठीपुरा : या ठिकाणी म्हाडा प्राधिकरणाला 1000 ते 1200 नवीन घर मिळणार आहेत. म्हणजेच या घरांसाठी सुद्धा आगामी काळात लॉटरी जाहीर होणार आहे.
अभ्युदय नगर : पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्राधिकरणाला पाचशे ते सहाशे नवीन सदनिका प्राप्त होतील अशी माहिती समोर आली आहे.
वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर वरळी : या भागात प्राधिकरणाला पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून हजार ते पंधराशे घरांचा फायदा होणार आहे. म्हणजेच 1000 ते 1500 घर म्हाडा प्राधिकरणाला मिळतील आणि या घरांसाठी प्राधिकरणाकडून आगामी काळात लॉटरी जाहीर केली जाणार आहे.