म्हाडाकडून मुंबईत 120 सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध; 5 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Published on -

Mhada News : मुंबईतील घर खरेदीची संधी शोधणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने दिलासादायक घोषणा केली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील एकूण 120 सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या सदनिकांसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार आहे.

या योजनेत यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या, मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. इच्छुक नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा तसेच योजना व सदनिका निश्चितीची प्रक्रिया 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदाराला ‘बुक माय होम’ हा पर्याय उपलब्ध होईल. त्यामध्ये विंग किंवा इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक तसेच मजल्याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. उपलब्ध सदनिकांमधून अर्जदार आपल्या पसंतीची सदनिका निवडू शकतो.

मात्र एकदा अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जामध्ये कोणताही फेरफार करता येणार नाही. त्यामुळे अर्जदारांनी प्रिंटेड पावतीतील माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

सदनिका निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रकमेचा भरणा करणे बंधनकारक आहे. ही रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्यानंतर अर्जदारास ऑनलाइन पद्धतीने उर्वरित रक्कम भरण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येणार आहे.

सदनिकांच्या तपशीलाबाबत सांगायचे झाल्यास, म्हाडाने बांधलेल्या शिंपोली, कांदिवली येथील 8, चारकोप सेक्टर-8 कांदिवली येथील 2, अँटॉप हिल-वडाळा येथील 27, तुंगा पवई येथील 44, पीएमजीपी मानखुर्द येथील 1, मालवणी मालाड येथील 1 आणि गायकवाड नगर मालवणी-मालाड येथील 1 अशा एकूण 84 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तसेच विकास नियंत्रण नियमावली 33(5) व 33(7) अंतर्गत प्राप्त झालेल्या घाटकोपर पूर्व, विक्रोळी, वडाळा, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, शीव आणि अंधेरी पश्चिम येथील एकूण 36 सदनिका देखील विक्रीसाठी देण्यात आल्या आहेत. मुंबईतील विविध भागांत घर घेण्याची सुवर्णसंधी असल्याने या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News