पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात; ‘या’ मुहूर्तावर होणार उदघाट्न !

Published on -

Missing Link Project : पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी, या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या १३० मीटर उंचीच्या केबल ब्रिजवरील स्लॅब टाकण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.

पुढील दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून, तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक कोंडी प्रवाशांना सहन करावी लागणार आहे.

पुणे व मुंबईमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी, तसेच खंडाळा–बोर घाटातील वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

सध्या लोणावळा परिसरात द्रुतगती मार्ग आणि मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल नाक्याजवळ एकत्र येतात, तर खंडाळा एक्झिटजवळ वेगळे होतात.

आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा सहा पदरी मार्ग असून, येथे दहा पदरी वाहतूक एकाच वेळी येऊन मिळते. घाटाचा भाग, तीव्र वळणे, चढ–उतार आणि पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते.

या पार्श्वभूमीवर खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ मार्ग विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन बोगदे, दोन व्हायाडक्ट आणि आठ पदरी नवीन रस्ता उभारण्यात आला आहे.

मुंबईकडून पुण्याकडे येताना एक किलोमीटर लांबीचा बोगदा, तर पुण्याकडून मुंबईकडे जाताना तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला असून, दोन्ही बोगद्यांची कामे आधीच पूर्ण झाली आहेत.

या प्रकल्पातील केबल ब्रिजची लांबी ६४५ मीटर असून उंची २१० मीटर आहे. आशिया खंडातील सर्वांत उंच दरीवरील पूल असल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पुणे–मुंबई अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होणार आहे.

दरम्यान, आडोशी येथे अलीकडेच गॅस टँकर उलटल्यामुळे दोन दिवस महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे केबल ब्रिजचे काम उशिरा सुरू झाले असले तरी, एप्रिलअखेरपर्यंत काम पूर्ण करून मे महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News