MPSC News: एमपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील लाखो नवयुवक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे.
दरम्यान याच परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी पात्र उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादेतील शिथिलता देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो उमेदवारांना थेट लाभ होणार असून, पूर्वी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना आता पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

त्यामुळे आता राज्यातील हजारो उमेदवारांच्या माध्यमातून आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. खरे तर उमेदवारांनी वयोमर्यादा वाढवून द्यावी यासाठी आयोगाकडे पाठपुरावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून यासाठी विविध संघटना शासनाशी पत्रव्यवहार करत होत्या.
अखेर आता या पाठपुराव्याला यश आले असून एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीस अनुसरून वयोमर्यादेत वाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. एक वेळची विशेष सवलत म्हणून कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही संधी देण्यात आली असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे. कोरोना काळात आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षा वेळेवर न झाल्याने उमेदवारांचे वय वाढले होते. या पार्श्वभूमीवर आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे परीक्षार्थ्यांकडून स्वागत केले जात असून, अनेक उमेदवारांनी एमपीएससीचे आभार मानले आहेत.
विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यभरात हजारो उमेदवारांना या निर्णयाचा फायदा होणार असला तरी सोलापूर जिल्ह्यातील गट-ब आणि गट-क परीक्षेची तयारी करणाऱ्या 60 पेक्षा अधिक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. या उमेदवारांपैकी काही जण भविष्यात शासकीय अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रांबाबतही एमपीएससीने स्पष्टता दिली आहे. अशा उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवरच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना केंद्राची निवड काळजीपूर्वक करावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. एमपीएससीच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.











