MTNL Share Price : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजार दबावात होता. मात्र मंगळवारपासून शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. काल मंगळवारी आणि आज बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे आणि या तेजीच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून आता त्याने जो स्टॉक घसरत होता तो एमटीएनएल चा स्टॉक देखील तेजीत आला आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असून एमटीएनएलच्या शेअर्स संदर्भात आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत आणि हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनी म्हणजे एमटीएनएल चा स्टॉक आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी २० टक्क्यांनी वाढला. सध्या हा स्टॉक ५७.१६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय.
या स्टॉकची प्रीवियस क्लोजिंग ही 47.64 एवढी होती. हा स्टॉक अवघ्या दोन दिवसात २७.५८ टक्क्यांनी वाढलाय. पण आता गुंतवणूकदारांच्या मनात गेल्या सहा महिन्यांपासून जो स्टॉक सातत्याने घसरत होता तो अचानक तेजीत का आलाय आणि ही तेजी किती दिवस कायम राहील? तेजी येण्याचे नेमके कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मंडळी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या सहा महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मात्र, आता कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक मोठी तेजी आली आहे आणि आज आपण ही तेजी येण्याचे नेमके कारण काय याबाबत माहिती पाहणार आहोत.
स्टॉक तेजीत येण्याचे कारण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कंपनीच्या 16,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मुद्रीकरणाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे कर्जाची परतफेड आणि ऑपरेशनल पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नवीन योजनेची घोषणा केली. त्याचा परिणाम सुद्धा शेअर्सवर झाला आहे अन याच्या स्टॉकच्या किंमती वाढल्यात असं जाणकार लोकांचे म्हणणे आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अरुणेश चावला यांनी एमटीएनएल आणि बीएसएनएलकडे असलेल्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत जेणेकरून निष्क्रिय असलेल्या मालमत्तेचा पुनर्वापर केला जाऊ शकेल, दायित्वांचा निपटारा केला जाऊ शकेल आणि आम्ही हे क्षेत्र पुन्हा सक्रिय करू शकू अशी माहिती दिली. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्ता मुद्रीकरणाबद्दल बोलताना त्यांनी हे भाष्य केले.
सरकारी मालकीच्या, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एमटीएनएलला गेल्या ऑक्टोबरमध्ये बहुतांश सरकारी बँकांनी अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित केले होते. एमटीएनएलवर बँकांची 7,925 कोटी रुपयांची थकबाकी असून, एकूण 32,000 कोटी रुपयांची थकबाकी असून त्यात अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन कर्जाचा समावेश आहे.
या स्टॉकची कामगिरी कशी राहिलीय?
हा स्टॉक सध्या 57.16 वर ट्रेड करतोय. या स्टॉक मध्ये सध्या वाढीचे ट्रेंड आहेत. पण आपल्या उच्चांकी पातळीपेक्षा हा स्टॉक अजूनही निम्म्याने खाली आहे. १०१.५ रुपयांच्या मागील उच्चांकी पातळीपेक्षा हा स्टॉक निम्म्याने खाली आला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिलाय.
मात्र या वर्षी हा स्टॉक सातत्याने फोकस मध्ये दिसतोय. यंदा आतापर्यंत या स्टॉकने १० टक्के इतका परतावा दिला आहे. मागील बारा महिन्यांचा विचार केला असता या स्टॉकने १५ टक्के इतका जोरदार परतावा दिला आहे. तसेच पाच वर्षांच्या लॉन्ग टर्म मध्ये हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी विशेष फायद्याचा ठरला असून या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना ४०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.