मुंबई – आग्रा महामार्ग प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! महामार्गाचा ‘हा’ टप्पा सहापदरी होणार, नितीन गडकरींची माहिती

Mumbai Agra Highway : मुंबई – आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ह्या मार्गांवरील वाढती वाहन संख्या पाहता हा महामार्ग आता प्रवाशांसाठी अपुरा पडत आहे. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, औद्योगिक विस्तार आणि सातत्याने होणारे अपघात या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारकडून या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई – आग्रा महामार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा अर्थातच पिंपळगाव बसवंत ते धुळे हा टप्पा आता सहा पदरी बनवण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरे तर हा महामार्ग चौपदरी आहे मात्र सध्याचा रस्ता वाढत्या वाहनांचा पार्श्वभूमीवर अपुरा पडतोय आणि म्हणूनच हा महामार्ग सहा पदरी व्हावा यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.

स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या महामार्गाच्या विस्तारासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत होते आणि अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री श्रीमान नितीन गडकरी यांनी पिंपळगाव बसवंत ते धुळे हा टप्पा सहा पदरी बनवण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती दिली आहे.

सदर कामासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पिंपळगाव बसवंत ते धुळे हा मुंबई आग्रा हायवे चा एक महत्त्वाचा टप्पा असून हा भाग सहा पदरी झाला तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना साहजिकच मोठा फायदा मिळणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक फायदा होईल. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून उत्तर भारताला मुंबईशी जोडणारा हा प्रमुख दुवा अधिक सक्षम होणार आहे. मालेगाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील या मार्गाचा फायदा होईल.

खरेतर हा टप्पा सहा पदरी व्हावा यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शिवबा बच्छाव यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यासाठी मोठा पाठपुरावा देखील केला.

दरम्यान, आता खासदार बच्छाव यांनी पिंपळगाव ते धुळे हा मार्ग सहापदरी होणार अशी माहिती दिली आहे. सध्या चार पदरी असलेल्या या महामार्गावर विशेषतः मालेगाव व धुळे परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मालवाहू ट्रक, खासगी वाहने, बसेस आणि स्थानिक वाहतुकीचा एकाच वेळी मोठा ताण येत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

पिंपळगाव ते धुळे सीमेपर्यंत सुमारे १२० ते १३० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग सहा पदरी करण्याचा प्रस्ताव असून, सध्याच्या सुमारे ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे विस्तारीकरण करून तो जागतिक दर्जाचा बनवण्यात येणार आहे. मालेगाव शहरातून जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ठिकाणी बायपास, उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांची योजना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चांदवड घाटातील अवघड वळणे कमी करून अतिरिक्त लेन व सुरक्षा भिंती उभारण्याचाही विचार सुरू आहे. हा महामार्ग भविष्यात ‘व्हाईट टॉपिंग’ म्हणजेच सिमेंट काँक्रीट पद्धतीने बांधण्यात येणार असल्याने पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. सहा पदरीकरण पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते धुळे हे अंतर किमान अर्ध्या तासाने कमी होऊन सुमारे दोन तासांत पार करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकल्पामुळे पिंपळगाव, लासलगाव परिसरातील कांदा, द्राक्षे यांसारख्या शेतीमालाची वाहतूक दिल्ली, पंजाब व इतर राज्यांत अधिक वेगाने होईल. तसेच दिल्ली–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला हा महामार्ग पूरक ठरणार असल्याने नाशिक व धुळे जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार असून सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.