Mumbai Goa Expressway : गेले दोन दिवस देशात सर्वत्र होळीचा सण साजरा करण्यात आला. होळी सणाच्या निमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. होळी आणि शिमग्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.
दरम्यान जर तुम्हीही कोकणात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मुंबई गोवा महामार्ग बाबत नुकतेच एक महत्त्वाचे अपडेट हाती आले असून या महामार्गावर काही वाहनांना बंदी राहणार आहे.

मुंबई, पुणे आणि अन्य महानगरांमध्ये स्थायिक असलेल्या लोकांनी सणासाठी आपल्या गावाची वाट धरली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा ओघ दिसून आला. सणाच्या उत्साहात प्रत्येकाने आपापल्या गावी जाऊन आनंद घेतला, मात्र आता हेच चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाले आहेत.
या प्रवासात त्यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या, 16 मार्च रोजी, मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
या निर्बंधांनुसार, दुपारी 12 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महामार्गावर अवजड वाहतूक बंद राहणार आहे. या बंदीमुळे होळीसाठी गावी गेलेल्या लोकांचा परतीचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरळीत होईल. वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.
या निर्बंधांमध्ये काही जीवनावश्यक सेवांना मात्र सूट देण्यात आली आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, औषधे आणि वैद्यकीय ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा खंडित होणार नाही.
सणाच्या काळात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महामार्गावर गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागत होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. विशेषतः रात्रीच्या वेळी काही भागांत वाहनांची गर्दी अधिकच वाढली होती. त्यामुळे प्रशासनाने यंदा वेळीच नियोजन करून परतीच्या प्रवासासाठी वाहतुकीचे नियमन केले आहे.
अवजड वाहनांवरील बंदीमुळे महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. यामुळे चाकरमान्यांना कमी वेळेत मुंबई, पुणे किंवा आपल्या गंतव्यस्थानी पोहोचता येईल. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सुटीनंतरच्या प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.