Mumbai – Kolhapur Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी कोल्हापूर – मुंबई रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर, महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यातील हजारो लाखो आंबेडकरी अनुयायी राजधानी मुंबईत गर्दी करणार आहेत.
दरम्यान मुंबई दाखल होणाऱ्या याच अनुयायींसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अनुयायींना मुंबईत सहज दाखल होता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई-कोल्हापूर मार्गावर होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई अशा दोन्ही दिशेने या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे या मार्गावर होणारी अतिरिक्त प्रवाशांची गर्दी नियंत्रणात राहील अशी आशा व्यक्त होत आहे.
महत्वाची बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाने या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे सुद्धा जाहीर केले आहेत. ही गाडी महाराष्ट्रातील तब्बल 15 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणाऱ्याची माहिती सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
कस राहणार वेळापत्रक
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-मुंबई विशेष एक्स्प्रेस शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.40 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सोडली जाणार आहे. तसेच 6 डिसेंबर रोजी पहाटे 4.00 वाजता सीएसएमटी टर्मिनस येथे पोहचणार आहे.
शिवाय, मुंबई-कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता मुंबई सीएसएमटी येथून निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे.
या स्टेशनवर थांबणार
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर – मुंबई विशेष गाडी या मार्गावरील हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, किर्लोस्कर वाडी, कराड, सातारा, लोणंद जंक्शन, जेजुरी, पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, ठाणे, दादर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
नक्कीच सेंट्रल रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून या संबंधित रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार आहे. या स्पेशल गाडीचा सर्वाधिक लाभ राजधानी मुंबईत दाखल होणाऱ्या आंबेडकरी अनुयायींना होणार आहे.













