Mumbai Local : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे प्रवासात लवकरच मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळणार आहे. वाढत्या गर्दीमुळे लोकलच्या दारात लटकून प्रवास करताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने साध्या (Non-AC) लोकल गाड्यांनाही स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होणार आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्ट्री (ICF) येथे तयार झालेली पहिली विना-वातानुकूलित लोकल फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे. या लोकलचे डिझाइन अंतिम करण्यात आले असून उत्पादन प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबईत पोहोचल्यानंतर या गाडीच्या विविध सुरक्षा व तांत्रिक चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर ही लोकल मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सामील केली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर प्रवासी साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची मागणी करत होते. विशेषतः मुंब्रा आणि कळवा परिसरात लोकलच्या दारातून पडून झालेल्या जीवघेण्या अपघातांनंतर या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देण्यात आले.
दरवाजे बंद असल्याशिवाय गाडी स्थानकातून सुटणार नाही, अशी अत्याधुनिक यंत्रणा या नव्या लोकलमध्ये असणार आहे. त्यामुळे फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करण्याची वेळच येणार नाही.
केवळ स्वयंचलित दरवाजेच नव्हे, तर वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 15 डब्यांच्या तीन नवीन लोकल गाड्या देण्याचेही नियोजन केले आहे. सध्या 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांवर मोठा ताण पडतो.
या नवीन गाड्यांमुळे प्रवाशांची गर्दी विभागली जाईल आणि प्रवास अधिक सुलभ होईल. या लोकलमध्ये आधुनिक सुरक्षा यंत्रणा, सुधारित आसन व्यवस्था आणि ‘फोर्स्ड व्हेंटिलेशन’ प्रणाली बसवण्यात येणार आहे, ज्यामुळे दरवाजे बंद असतानाही गाडीमध्ये हवा खेळती राहील.
दरवर्षी मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये सरासरी 2500 ते 3000 प्रवाशांचा अपघातात मृत्यू होतो, यामध्ये फूटबोर्डवरून पडण्याच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे.
स्वयंचलित दरवाज्यांमुळे हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाचे हे पाऊल मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारे ठरेल.













