Mumbai Local News : मुंबईची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. उपनगरीय रेल्वे सेवांवरील वाढती गर्दी कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करणे या उद्देशाने पश्चिम रेल्वेने आजपासून ४ नवीन १२-डब्यांच्या (Non-AC) लोकल गाड्या सुरू केल्या आहेत.
या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या १४०६ वरून १४१० इतकी झाली आहे. कांदिवली आणि बोरीवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे या अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य झाले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होऊन प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
नवीन सुरू करण्यात आलेल्या चार उपनगरीय लोकल सेवांपैकी दोन ‘अप’ दिशेला आणि दोन ‘डाऊन’ दिशेला धावणार आहेत. या सर्व गाड्या ‘स्लो’ (धीमी) मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
‘अप’ दिशेला सकाळी ११:३९ वाजता भाईंदरहून वांद्रेसाठी एक लोकल सुटेल, तर दुसरी लोकल दुपारी १२:१४ वाजता भाईंदरहून थेट चर्चगेटसाठी धावणार आहे.
त्याचप्रमाणे ‘डाऊन’ दिशेला वांद्रे ते भाईंदर दरम्यान दोन अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहाटे ४:३० वाजता आणि दुपारी १:२१ वाजता वांद्रे स्थानकावरून गाड्या सुटणार आहेत. या चारही गाड्या १२-डब्यांच्या असून त्या नॉन-एसी श्रेणीत असतील.
दरम्यान, या नव्या फेऱ्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यासाठी काही जुन्या लोकल गाड्यांच्या वेळेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर किंवा स्थानकावरील अद्ययावत वेळापत्रक तपासावे,
असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नव्या सेवांमुळे प्रवाशांची गर्दी कमी होऊन दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.













