Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मेट्रो प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो लाइन ८ अर्थात गोल्ड लाइनबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.
ही मेट्रो लाईन थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना जोडणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच देशातील दोन मोठ्या विमानतळांदरम्यान थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून, प्रवाशांचा वेळ, पैसा आणि कष्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने मेट्रो लाइन ८ ला यापूर्वीच मंजुरी दिली असून, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, २०२९ पर्यंत मेट्रो लाइन ८ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील चार वर्षांत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊन मुंबई आणि नवी मुंबईला वेगवान सार्वजनिक वाहतूक जोड मिळणार आहे.
सध्या मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास करण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे ७० ते १२० मिनिटांचा वेळ लागतो.
मात्र मेट्रो लाइन ८ सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे प्रवाशांचा सरासरी ४० मिनिटांचा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.
मेट्रो लाइन ८ ची एकूण लांबी सुमारे ३४.८९ ते ४० किलोमीटर इतकी असणार आहे. यामध्ये उन्नत आणि भूमिगत अशा दोन्ही प्रकारच्या मार्गांचा समावेश आहे.
CSMIA टर्मिनल २ ते चेंबूरच्या छेडा नगरपर्यंतचा ९.२५ किमीचा मार्ग भूमिगत असणार असून, या टप्प्यात सहा स्थानके असतील. पुढे हा मार्ग वाशी खाडी ओलांडून सायन–पनवेल महामार्गाजवळून नवी मुंबईत प्रवेश करेल.
या मेट्रो मार्गावर एकूण २० स्थानके असतील. त्यापैकी १४ उन्नत आणि ६ भूमिगत स्थानके असणार आहेत. नवी मुंबई परिसरातच ११ स्थानके असतील.
प्रमुख स्थानकांमध्ये CSMIA टर्मिनल २, मरोळ नाका, साकीनाका, पवई, कांजुरमार्ग, मुलुंड पूर्व, ऐरोली, घणसोली, वाशी, नेरुळ, सीवूड्स, उलवे आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील टर्मिनल १ व २ यांचा समावेश आहे.
मेट्रो लाइन ८ मुळे मुंबई–नवी मुंबई प्रवासाला नवे परिमाण मिळणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.













