Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई पुणे नागपूर शहरांमध्ये मेट्रो सुरू असून या मेट्रो मार्ग प्रकल्पांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास फारच वेगवान झाला आहे.
एवढेच नाही तर या संबंधित महानगरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोचे विस्तारीकरण करण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई शहरा समवेतच मुंबई उपनगर मध्ये देखील आता मेट्रो सुरु झाली असून मुंबई उपनगरांमधील आणखी एका महत्त्वाच्या उपनगराला आता मेट्रोची भेट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकरच एक नवा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असून यामुळे बदलापूर तसेच अंबरनाथहुन आता थेट मुंबईला पोहोचता येणे शक्य होणार आहे.
एमएमआरडीएने या चालू वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचे काम हाती घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर नेमका काय परिणाम होणार यासाठी आता सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामाला गती मिळणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बदलापूर वासियांना मुंबई शहरात जलद गतीने पोहोचता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जो सल्लागार नियुक्त केला जाणार आहे त्या सल्लागाराला पर्यावरण मंजुरी घेण्याचेही काम करावे लागणार आहे.
दरम्यान, सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा सुद्धा मागविल्या आहेत. नक्कीच या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून घेण्यात आलेला हा निर्णय मोठा फायद्याचा राहणार असून आज आपण या प्रकल्पाची सर्व माहिती अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा मेट्रो मार्ग?
कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो म्हणजे मेट्रो मार्गिका 14 ही 38 किमी लांबीची राहणार आहे. या मेट्रोवर 15 स्थानके विकसित केली जाणार आहेत. या नव्याने विकसित होणाऱ्या मेट्रोमार्ग प्रकल्पामुळे अंबरनाथ-बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडला जाणार आहे अन हा प्रकल्प शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
या मेट्रो मार्गावर जी पंधरा स्थानके विकसित होणार आहेत त्यापैकी तेरा स्थानके उन्नत राहणार आहेत आणि बाकीचे दोन स्थानके भूमीगत राहतील. हा मेट्रो मार्ग बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचणार आहे.