Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी अर्थातच मुंबईत होणारी वाहतूक कोंडी ही साऱ्या जगाला ठाऊक आहे. मुंबईत अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना तासंतास अडकून पडावे लागते. पण आता या मायानगरीच्या वाहतुकीला नवे आयाम देण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. दरम्यान, शहरातील सर्वात मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कफ परेड ते सीप्झ मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गावरील सेवा येत्या जून 2025 पासून कार्यान्वित होणार आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ मार्च 2025 रोजी विधानसभेत याची घोषणा केली आहे.
यामुळे सध्या मुंबईकरांमध्ये या मेट्रोमार्गाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. दरम्यान आता आपण या मेट्रो मार्गाचा संपूर्ण रूट कसा आहे आणि याचा मुंबईकरांना कसा फायदा होईल याची माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट
या मेट्रो सेवेमुळे दक्षिण मुंबईपासून अंधेरीपर्यंत प्रवासाचा कालावधी हा सध्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या मेट्रो मार्गामुळे दक्षिण मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत दक्षिण मुंबई मधील नागरिकांना वाहतूक कोंडी आणि वेळखाऊ प्रवासाचा त्रासदायक अनुभव येत आहे.
मात्र, मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, अशी आशा जाणकारांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, 2014 ते 2019 या कालावधीत मुंबईत 10 मेट्रो लाईन्सना मंजुरी देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.
महत्त्वाची बाब अशी की या दहापैकी काही लाईन्स कार्यान्वित झाल्या आहेत, तर काही अंतिम टप्प्यात असून उर्वरित काहींचे बांधकाम वेगाने सुरू आहे. दरम्यान मुंबई मधील हा सर्वाधिक लांबीचा भुयारी मेट्रो मार्ग देखील असाच एक महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग प्रकल्प आहे जो की राजधानीमधला पहिला पूर्णतः भुयारी मार्ग आहे.
या कफ परेड ते सीप्झ मेट्रोमुळे गतीमान प्रवास होईल, या मेट्रोमुळे प्रवाशांचा सध्याचा प्रवास वेळ निम्म्याने कमी होणार असा अंदाज आहे. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकांवर सुरक्षितता, स्वच्छता आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, हा मेट्रो प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.
या सेवेमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणावर नियंत्रण मिळेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरेतर, मुंबईकरांना या नव्या मेट्रो मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरता लागली आहे, अशातच आता 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.