Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये वाहतुकीचा पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबई शहरात आणि उपनगरात आतापर्यंत शेकडो किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे.
दरम्यान, आता मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुंबई शहराला आणखी एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर दरम्यान नवा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग 10.54 किमी लांबीचा असेल, सध्या याच मेट्रो लाइन-9 प्रकल्पाच्या उभारणीस वेग आला आहे.
या मार्गावर एकूण आठ उन्नत स्थानकांची उभारणी होणार असून, डोंगरी येथे मेट्रोसाठी कार डेपो उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात डेपोच्या प्रस्तावित स्थळी झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले.
या भागात प्रवेश मर्यादित असल्यामुळे 2,500 झाडांवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. ऑक्टोबर 2024 मध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेस (MBMC) या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला.
त्यानुसार, 1,668 झाडे वाचवली जाणार असून त्यापैकी 574 झाडांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, तर 1,094 झाडे अपरिवर्तित राहतील. मात्र, 832 झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या कामांसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. जमिनीचे सर्वेक्षण, झाडांचे मूल्यमापन व अन्य तपशीलवार अभ्यास पूर्ण झाला असून, डेपोच्या जागेवर संपूर्ण प्रवेश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासही करण्यात आला.
फेब्रुवारी 2025 मध्ये अतिरिक्त 9,900 झाडांवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवणारा दुसरा प्रस्ताव MBMC कडे पाठवण्यात आला. या झाडांपैकी 7,016 झाडांचे स्थलांतर मीरा-भाईंदर परिसरातच केले जाणार असून, 2,884 झाडे तोडली जाणार आहेत.
प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांमध्ये एकूण 3,716 झाडे स्थलांतर अयोग्य असल्यामुळे कापावी लागणार आहेत. मात्र, 7,590 झाडांचे पुनर्स्थापना कार्य होईल आणि 1,094 झाडे तशीच ठेवली जातील. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि वृक्षतोडीच्या परिणामांची भरपाई करण्यासाठी, मीरा-भाईंदरमध्ये सुमारे 25,000 नव्या झाडांची लागवड केली जाणार आहे.
यासाठी आवश्यक निधी MMRDA तर्फे उपलब्ध करून दिला जाणार आहे. या मेट्रो प्रकल्पात पर्यावरणपूरक उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत असून, नवी तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे.
ऊर्जा बचतीसाठी प्रगत पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे ब्रेकिंग दरम्यान निर्माण होणारी गतिज ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होऊन ऊर्जा खर्च कमी होईल.
तसेच, सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहन देऊन वाहतूक कोंडी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच, पर्यावरण संवर्धन हे MMRDA चे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे.
प्रीकास्ट सिमेंट तुकड्यांचा वापर, हिरव्या इमारतींसाठी आवश्यक प्रमाणपत्रे, आणि इतर पर्यावरणस्नेही बांधकाम तंत्रज्ञानांचा अवलंब करून, मुंबईसाठी एक शाश्वत आणि प्रदूषणमुक्त भविष्य घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.