Mumbai Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. या शहरांमधील मेट्रोमार्ग प्रकल्पांच्या कामाला गती मिळावी या अनुषंगाने अर्थसंकल्पात भरीव निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी पुणे, नागपूर आणि मुंबई मध्ये आगामी काळात आणखी काही नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती दिली असून ठाण्यात सुद्धा मेट्रो सुरु होणार आहे. नाशिक मध्ये देखील मेट्रो सुरु करण्यासाठी हालचाली तेज झाल्या आहेत.

अशी सारी परिस्थिती असतानाच आता राजधानी मुंबईमधील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राजधानीमधील नागरिकांना आता आणखी एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. या नव्या मार्गामुळे बदलापूर-अंबरनाथ मधील जनतेला थेट मेट्रोने मुंबईच्या हद्दीमध्ये पोहोचता येईल अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रोमार्ग 14 मार्गिकेचे काम या चालू वर्षात सुरू केले जाणार असून यासाठी आवश्यक हालचाली आत्तापासूनच पाहायला मिळतं आहेत. दरम्यान आता याच मेट्रो मार्ग 14 प्रकल्पाबाबत एक नव अपडेट हाती आल आहे.
काय आहे नवीन अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार मेट्रोमार्ग 14 प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून हा सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा सुद्धा मागवण्यात आल्या आहेत.
म्हणजेच येत्या काही दिवसांनी या कामासाठी प्रत्यक्षात सल्लागाराची नियुक्ती होणार आहे आणि त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग येईल अशी आशा आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी जो सल्लागार नियुक्त केला जाणार आहे त्या सल्लागारालाच पर्यावरण विभागाची मंजुरी सुद्धा मिळवावी लागणार आहे.
सध्या कांजूरमार्ग ते बदलापूर या दरम्यानचा प्रवास करायचा म्हणजे प्रवाशांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागतो आणि रस्ते मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना किमान अडीच ते तीन तासांचा वेळ खर्च करावा लागतोय.
परंतु जेव्हा हा मेट्रो मार्ग 14 प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे रस्त्यांवरील ताण कमी होईल अशी आशा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ-बदलापूरचा परिसर मुंबई-ठाणे-भिवंडी या भागाला जोडला जाणार आहे.
या प्रकल्पाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचणार आहे.
हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा राहणार असून यावर 15 स्थानके तयार होणार आहेत त्यापैकी तेरा स्थानके उन्नत राहणार आहेत आणि उर्वरित स्थानके अंडरग्राउंड राहतील.