Mumbai Metro : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आधुनिक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन ८ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली मार्गाच्या कामांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले. कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मेट्रो लाईन ८ साठी भूसंपादनासह सर्व प्रकारच्या परवानग्या पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक मंजुरी मिळवणे बंधनकारक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या मेट्रो मार्गाची एकूण लांबी सुमारे ३३.३५ किलोमीटर असून यामध्ये ९.२५ किलोमीटर भूमिगत आणि २४ किलोमीटर उन्नत मार्ग असेल. एकूण २० स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानके असतील.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल ३ ते घाटकोपर पूर्व हा मार्ग भूमिगत असेल, तर घाटकोपर पश्चिम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ हा उन्नत मार्ग असेल. दोन स्थानकांतील सरासरी अंतर सुमारे १.९ किलोमीटर असेल. या प्रकल्पासाठी ३०.७ हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यासाठी अंदाजे ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
याच बैठकीत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गालाही मंजुरी देण्यात आली. ६६.१५ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ३,९५४ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड या ८५.७६ किलोमीटर लांबीच्या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गालाही मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयांमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













