Mumbai – Nanded Vande Bharat : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी वाढणार आहे. राज्यातील दोन महत्त्वाचे जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहेत. सध्या राज्यात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर,
सीएसएमटी ते मडगाव मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

दरम्यान या गाड्यांपैकी सीएसएमटी ते जालना या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार केला जाणार आहे. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेड वरून सोडली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या विस्ताराला मान्यता सुद्धा दिली आहे.
त्यामुळे मराठवाड्यातील आणखी दोन जिल्हे वंदे भारत च्या नकाशावर येणार आहेत. या विस्ताराचा परभणी आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. पण त्याचवेळी या विस्ताराचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांना फटका बसू शकतो असा युक्तिवाद संभाजीनगर मधील प्रवाशांकडून केला जात आहे.
यामुळे संभाजीनगर येथील प्रवाशांनी या विस्ताराला विरोध दाखवला आहे. तथापि रेल्वे बोर्डाकडून या विस्ताराला अधिकृत मान्यता मिळाली असल्याने आगामी काळात ही गाडी आपल्याला नांदेड पर्यंत धावताना दिसणार आहे. परंतु याची अधिकृत तारीख अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे ही गाडी नांदेड पर्यंत केव्हापासून धावणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
दरम्यान आज आपण मुंबई ते नांदेड दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली तर याचे वेळापत्रक कसे राहणार ? याचे तिकीट दर कसे असणार, ही गाडी कुठे कुठे थांबणार? या संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक कसे राहणार?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रेल्वे स्थानकावरून ही वंदे भारत ट्रेन सकाळी पाच वाजता सोडली जाणार आहे आणि दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी ही गाडी मुंबई रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून ही गाडी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी नांदेड येथील रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. नक्कीच या गाडीमुळे नांदेड ते मुंबई हा प्रवास वेगवान होणार आहे. नांदेड सोबतच या गाडीचा परभणी जिल्ह्यातील प्रवाशांना सुद्धा फायदा होणार आहे.
कोण कोणत्या स्थानावर थांबणार वंदे भारत एक्सप्रेस
जालना – मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन नांदेड पर्यंत सुरू झाली तर ही गाडी या मार्गावरील परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तिकीट दर कसे असणार ?
रेल्वे बोर्डाने मुंबई – जालना वंदे भारत ट्रेन नांदेड पर्यंत चालवण्यास मान्यता दिली आहे. मात्र नांदेड पर्यंत विस्तार झाल्यानंतर या गाडीचे तिकीट दर कसे असणार या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पण मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट 1750 आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3300 रुपये प्रति प्रवासी असू शकते.