मुंबईकरांना दिलासा! २०२६ मध्ये पाच मोठे पूल व उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार

Published on -

Mumbai News : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने २०२६ हे वर्ष मुंबईकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला सायन पूर्व-पश्चिम पूल अखेर १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची अधिकृत माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिली आहे.

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच सायन पुलाची पाहणी करून जुलै अखेरीस हा पूल कार्यान्वित होईल, अशी घोषणा केली.

बीएमसीच्या माहितीनुसार, सायन पुलासह २०२६ मध्ये मुंबईत एकूण पाच महत्त्वाचे पूल आणि उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत. यामध्ये बेलासिस उड्डाणपूल, दिंडोशी-फिल्म सिटी उड्डाणपूल (GMLR प्रकल्प), सायन पूर्व-पश्चिम उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि महालक्ष्मी केबल-स्टेड ब्रिज यांचा समावेश आहे.

बेलासिस उड्डाणपूलाचे बांधकाम अवघ्या १५ महिने आणि ६ दिवसांत पूर्ण झाले असून तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर असून, यामुळे मध्य मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी कोर्ट ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचा उड्डाणपूल ७५ टक्के पूर्ण झाला आहे. हा पूल ३१ मे २०२६ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट असून, त्यामुळे गोरेगाव ते मुलुंडचा सध्याचा सुमारे ७५ मिनिटांचा प्रवास केवळ २५ मिनिटांत होणार आहे.

सायन पूर्व-पश्चिम उड्डाणपूलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू असून, पश्चिम भागाचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर पूर्वेकडील काम ३० ते ४५ दिवसांत पूर्ण होऊन जुलैमध्ये पूल खुला केला जाईल.

विद्याविहार पुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, हा पूल घाटकोपर पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. जूनमध्ये तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईचा पहिला केबल-स्टेड ब्रिज असलेला महालक्ष्मी पूल ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe