Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाला नवी गती देणारी एक महत्त्वाची घोषणा नुकतीच झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8 ला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सिडकोच्या नेतृत्वाखाली राबवला जाणारा हा प्रकल्प प्रवाशांच्या सोयीसह शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणार आहे.
सिडकोने मेट्रो प्रकल्पाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज केले आहे. मेट्रो मार्गिका 1 साठी स्थापन केलेले ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (OCC) रिअल-टाइम ट्रेन हालचालींचे व्यवस्थापन करते. याशिवाय, मेट्रो ट्रेन ड्रायव्हिंग सिम्युलेटरसारख्या अत्याधुनिक प्रशिक्षण यंत्रणेमुळे चालकांना गती आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण मिळते. या सर्व उपाययोजनांमुळे मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह होणार आहे.

मेट्रो मार्गिका 8
मेट्रो मार्गिका 8 ही 35 किलोमीटर लांबीची असणार आहे. यापैकी 9.25 किलोमीटर भुयारी, तर 25.63 किलोमीटर उन्नत मार्ग असेल. हा मार्ग मुंबईतील टर्मिनल 2 पासून सुरू होऊन छेडानगरपर्यंत भुयारी असेल आणि त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्गाने पोहोचेल.
प्रवासादरम्यान हा मार्ग कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, वाशी, नेरूळ आणि बेलापूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडेल. यामुळे प्रवाशांना दोन्ही विमानतळांदरम्यान जलद आणि सुविधाजनक प्रवासाचा अनुभव मिळेल.
जागतिक दर्जाचे मेट्रो नेटवर्क
हा मेट्रो प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवसंजीवनी देणार आहे. दोन्ही विमानतळांना जोडणारी ही मेट्रो केवळ प्रवाशांच्या सोयीपुरती मर्यादित नसून, शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना देईल. सिडकोच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यावर मुंबई-नवी मुंबई क्षेत्र हे जागतिक दर्जाचे मेट्रो नेटवर्क असलेले शहर म्हणून ओळखले जाईल.
मेट्रो मार्गिका 2
सिडकोने मूळ नियोजित मेट्रो मार्गिका 2, 3 आणि 4 एकत्र करून एकच मेट्रो मार्गिका 2 तयार केली आहे. हा 16 किलोमीटर लांबीचा मार्ग पेंधरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्व भागापर्यंत असेल. या मार्गामुळे पीएमएवाय गृहनिर्माण क्लस्टर, तळोजा एमआयडीसी आणि इतर निवासी क्षेत्रांना जोडणी मिळेल. या कॉरिडॉरमुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः दैनंदिन प्रवासी आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सध्या तयार होत आहे.
नवी मुंबई मेट्रो
नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा, म्हणजेच मार्गिका 1, नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झाला. ही 11.1 किलोमीटर लांबीची मेट्रो सीबीडी बेलापूर ते पेंधर जोडते. महा मेट्रोद्वारे संचालित ही मार्गिका खारघर, तळोजा आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी वरदान ठरली आहे. आता सिडको या मार्गाचा 3.02 किलोमीटरने विस्तार करून बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडणार आहे. हा विस्तार मेट्रो मार्गिका 8 शी एकत्रित होईल, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्क अधिक सक्षम होईल.
नैना क्षेत्रासाठी विशेष योजना
नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र (NAINA) च्या वाढत्या महत्त्वाला ओळखून, सिडकोने या क्षेत्रासाठी दोन स्वतंत्र मेट्रो मार्गिकांचे डीपीआर तयार करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गिका विमानतळ परिसरातील नियोजित औद्योगिक, निवासी आणि संस्थात्मक विकासांना वाहतूक सुविधा पुरवतील. यामुळे नैना क्षेत्राचा सर्वांगीण विकास साध्य होईल आणि भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण होतील.
प्रवाशांसाठी काय फायदे ?
विमानतळ जोडणी: दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यान जलद आणि विश्वासार्ह प्रवास.
वाहतूक कोंडीतून मुक्ती: रस्त्यावरील वाहनांचा ताण कमी होऊन प्रवास वेळेत बचत.
कनेक्टिंग फ्लाइट्ससाठी सोय: कमी वेळेत विमानतळांदरम्यान प्रवास शक्य.
वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेणे: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुविधा.
औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांना जोडणी: तळोजा एमआयडीसी, पीएमएवाय क्लस्टर आणि इतर भागांना थेट मेट्रो सुविधा.