Mumbai News : राजधानी मुंबई मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास भविष्यात गतिमान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात मुंबईतील कोणत्याही भागातून नवी मुंबई एअरपोर्टला फक्त 17 मिनिटात जाता येणार आहे. यासाठी मुंबईतून वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे.
या वॉटर टॅक्सीमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीच या वॉटर टॅक्सी बाबत माहिती दिली आहे.

तसेच, मुंबई आणि ठाणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. खरंतर गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात विशेषता जेव्हापासून मोदी सरकार केंद्रात आले आहे तेव्हापासून रस्ते उभारणीवर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
रस्त्यांसोबतच रेल्वे निर्माण वाहतूक सुधारण्यासाठी देखील शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सोबतच आता जलवाहतुकीकडेही सरकारने लक्ष घातले आहे.
मुंबईमधील जलवाहतूक सुधारण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलतांना असे म्हटले आहे की, प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मुंबईच्या कोणत्याही भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त 17 मिनिटे लागतील.
या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी विमानतळाजवळ एक ‘जेट्टी’ आधीच बांधण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्याच्या सभोवतालच्या विशाल सागरी मार्गांचा वापर केल्यास मुंबई ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होईल तसेच अनेक प्रमुख महामार्गांवरील वाहनांची संख्या कमी होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.
सागरी मार्गांमुळे आम्ही मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. ते पूर्णपणे सुरू झाल्यानंतर बाह्य वाहतुकीचे मार्ग बदलतील आणि महानगरांमधील गर्दी कमी होईल असेही गडकरी म्हणाले आहेत.
गडकरी यांनी मुंबई पुणे महामार्गावरील ट्रॅफिक निम्म्याने कमी होणार असाही दावा यावेळी केला आहे. यासाठी एका नवीन महामार्गाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती गडकरी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मुंबई ते बेंगलोर व्हाया पुणे असा हा नवा महामार्ग असेल आणि यामुळे मुंबई ते पुणे आणि पुणे ते बेंगलोर हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.