Mumbai News : राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशा महानगरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली आहे. अशातच आता मुंबई मेट्रो संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईला आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून यामुळे शहरातील दोन महत्त्वाचे परिसर मेट्रोच्या नकाशावर येणार आहेत.
या नव्या प्रस्तावित मेट्रोमार्गामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदललाय.

मेट्रोच्या प्रकल्पांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी भक्कम झाली आहे. शहरात मेट्रोचे अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत आणि काही प्रकल्पांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दहिसर ते भाईंदर यादरम्यानही मेट्रो मार्ग विकसित केला जातोय.
ह्या मेट्रो 9 मार्गिकेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असून यावर चाचणी पण घेतली जाणार आहे. या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर तसेच उत्तरेकडील उपनगरांतील नागरिकांना प्रवासाची एक मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
याच बरोबरीने मिरा-भाईंदर परिसरात आणखी एका महत्वाच्या मेट्रो प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. गायमुख ते मिरा भाईंदर (शिवाजी चौक) दरम्यान नवा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. या मेट्रो 10 प्रकल्पासाठी आता लवकरच निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
ही प्रक्रिया 15 डिसेंबरपूर्वी सुरू होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 15 डिसेंबरच्या सुमारास या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
हे आहेत या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्ये
मेट्रो 10 हा पूर्णपणे एलिव्हेटेड मार्ग राहणार असून याची लांबी 9.718 किमी असेल. या प्रकल्पासाठी तब्बल 8 हजार कोटी रुपये खर्च केला जाईल अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
ह्या मार्गिकेवर एकूण 5 स्थानके तयार केली जाणार आहेत. या मार्गावर गायमुख, रेती बंदर, चेना गाव, वरसावा गाव, काशिमिरा आणि मिरागाव ही प्रमुख स्थानके राहतील.
विशेष म्हणजे या मार्गासाठीचा मेट्रो डेपो मोघरा पाडा येथे उभारण्यात येणार आहे. सध्या या मार्गासाठी वन, सीआरझेड, कांदळवन आणि पर्यावरणीय परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सल्लागारांनी मेट्रो मार्ग आणि 60 मीटर रुंद रस्त्यासाठी आवश्यक निविदा दस्तावेज पण तयार केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हा प्रस्तावित मेट्रो मार्ग 4A मार्ग सोबत जोडला जाणार आहे. या मार्गाला मेट्रो 9 ची सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
हा प्रकल्प ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई मधील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित बनवणार आहे. हा मेट्रो मार्ग 2030 पर्यंत पूर्णपणे तयार होणार असाही दावा करण्यात आला आहे.













