Mumbai – Pune Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांच्या काळात राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
दरम्यान, भविष्यात मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आता दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरंतर, आधी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या महामार्गाचे आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, महत्त्वाची बाब म्हणजे याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सुद्धा पाठवण्यात आला होता. पण आता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे.
पुणे मुंबई एक्सप्रेस वे चे आठ पदरीकरणाचा प्रस्ताव रद्द करून आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता आपण राज्य रस्ते विकास महामंडळाच्या याच नव्या प्रस्तावाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे प्रस्ताव ?
मुंबई – पुणे एक्सप्रेस वे चे दहा पदरीकरण करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महामार्गाच्या दहा पदरीकरणासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाचा हा नवा प्रस्ताव नुकताच तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार अशी माहिती देण्यात आली आहे आहे.
आधी या महामार्गाचा 6 हजार 80 कोटी रुपयांचा आठ पदरीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता, मात्र मंजुरीपूर्वीच हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. एमएसआरडीसीने अभ्यासाअंती सध्याच्या आणि भविष्यातील वाहन वाढीचा अंदाज घेऊन आठपदरीकरणाचा प्रस्ताव मागे घेतला असून आता या मार्गाचे दहापदरीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान रस्ते विकास महामंडळाच्या या नव्या निर्णयामुळे दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन नव्या मार्गिका तयार होतील, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल, असा दावा करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पासाठी जो निधी लागणार आहे त्या निधी उभारण्यासाठी पथकर वसुलीची मुदत वाढवणे किंवा अर्थसंकल्पीय तरतुदीचा पर्याय सरकारसमोर मांडण्यात येणार आहे. यामुळे आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या नव्या प्रस्तावावर सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.