Mumbai Pune Expressway Traffic Jam : मागील काही वर्षांमध्ये भारतात असंख्य महामार्ग निर्माण झाले आहेत. राज्याला समृद्धी महामार्गासारखे हायटेक महामार्ग मिळाले आहेत. समृद्धी महामार्गांसारख्या नव्या प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्थेत एक नवीन क्रांती अनुभवायला मिळत आहे.
पण त्याच वेळी देशात असेही काही महामार्ग आहेत जिथे सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील असाच एक महामार्ग. हा एक सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो आणि नुकत्याच या महामार्गावर एक मोठी अनपेक्षित आणि चिंतेची घटना घडली.

या महामार्गावर तब्बल ३० तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने होणारी भीषण वाहतूक कोंडी, औद्योगिक पट्ट्यातील वाढती वाहनसंख्या आणि नुकतेच तब्बल ३२ तास महामार्ग ठप्प राहिल्याची घटना लक्षात घेता,
राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतलाय. यामुळे भविष्यात या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार नाही असा विश्वास व्यक्त होतोय.
तयार केला जाणार नवा मार्ग
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील ताण कायमस्वरूपी कमी करण्यासाठी शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत असा १३५ किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग उभारण्यास गती देण्यात येणार आहे.
या नव्या महामार्गामुळे भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास फारच सुसाट होणार आहे. मंडळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवार सायंकाळपासून जवळपास दीड दिवस वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
या घटनेनंतर केवळ मिसिंग लिंक प्रकल्प पुरेसा नसून, पर्यायी हाय-स्पीड मार्गाची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याच पार्श्वभूमीवर हा नवा महामार्ग ‘मल्टिमोडल कॉरिडॉर’ म्हणून विकसित केला जाणार आहे.
कसा असणार नवा मार्ग
या प्रकल्पाची एकूण लांबी १३५ किलोमीटर असून संपूर्ण महामार्ग चारपदरी (4-Lane) असेल. शिक्रापूर, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहने प्रवास करतात.
यामुळे सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. शिरूर–कर्जत हा नवा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ही जड वाहतूक थेट शहराबाहेरून मुंबईच्या दिशेने वळवता येणार आहे.
सध्या मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना चाकण, शिक्रापूर, तळेगाव आणि लोणावळा घाट मार्गे प्रवास करावा लागतो.
नव्या महामार्गामुळे मराठवाड्यातील वाहने शिरूर–खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचतील. यामुळे लोणावळा घाटावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, तो ‘बांधा–वापरा–हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर राबवला जाणार आहे.
अलीकडील वाहतूक कोंडीनंतर सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी ही भूतकाळात जमा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.













