मुंबई – पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवेची घोषणा

Published on -

Mumbai Pune Expressway : भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होणार आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र आता या दोन्ही महानगरांमधील प्रवास फक्त दीड तासात पूर्ण करता येणे शक्य होणार असा दावा केला जातोय.

कारण की आता या दोन्ही महानगरादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेस वे ची घोषणा केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी भव्य पायाभूत सुविधा पॅकेजची घोषणा केली आहे.

यामुळे राज्याच्या दळणवळण क्षेत्राला नवे बळ मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, येत्या एका वर्षात महाराष्ट्रभरात सुमारे १.५ लाख कोटींचे रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, या प्रकल्पांची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या पॅकेजमध्ये दुसरा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, पुणे जिल्ह्यासाठी तब्बल ५०,००० कोटींचे प्रकल्प तसेच पुणे–छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे. या पॅकेजमधील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा प्रकल्प म्हणजे दुसरा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे.

सध्याच्या द्रुतगती मार्गाला समांतर उभारण्यात येणारा हा सुमारे १३० किमी लांबीचा एक्सप्रेसवे अंदाजे ₹१५,००० कोटी खर्चाचा आहे. हा मार्ग जेएनपीए जवळील अटल सेतूपासून पुण्यातील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे.

एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ अवघ्या दीड तासांवर येईल, असा अंदाज आहे. तसेच पुणे–मुंबई–बेंगळुरू प्रवास साडेपाच तासांत पूर्ण होणार असल्याने पश्चिम आणि दक्षिण भारतातील दळणवळण अधिक गतिमान होईल.

या प्रकल्पाचा पागोटे (जेएनपीए जवळ) ते चौक (पनवेल) दरम्यानचा पहिला टप्पा आधीच मंजूर झाला आहे. याशिवाय पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडणाऱ्या नव्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचीही घोषणा करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १६,३१८ कोटी असून, या मार्गामुळे पुणे–छत्रपती संभाजीनगर प्रवास केवळ दोन तासांत शक्य होईल. तसेच छत्रपती संभाजीनगर ते नागपूर प्रवास अडीच ते तीन तासांत पूर्ण होईल, असा दावा गडकरी यांनी केला.

राज्यव्यापी पॅकेजमध्ये पुणे जिल्ह्याला सर्वाधिक वाटा देण्यात आला असून, फक्त जिल्ह्यासाठी सुमारे ५०,००० कोटींचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यामध्ये तळेगाव–चाकण–शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉरचा समावेश आहे.

४,२०७ कोटी खर्चाच्या या चार-स्तरीय प्रकल्पात जमिनीच्या पातळीवर रस्ता, दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो लाईन असणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच भूमिपूजन होणार आहे.

तसेच हडपसर–यवत एलिव्हेटेड रस्त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News