Mumbai Railway : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या नव्या निर्णयानुसार मुंबईवरून धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना कोकणातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील पालघर रेल्वे स्थानकावर लांबपल्ल्याच्या दोन रेल्वेगाड्यांना थांबा मंजूर करण्यात आला आहे.

खरेतर, पालघर रेल्वे स्थानकावर लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाला पाहिजे अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात होती आणि अखेर कार आता याच मागणीला यश आले आहे.
पश्चिम रेल्वेने काही गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर अतिरिक्त थांबा मंजूर केला आहे. यामुळे पालघर रेल्वे स्थानकावरून ये जा करणाऱ्या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या रेल्वे गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर
पश्चिम रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनस ते भोजे दरम्यान धावणारी कच्छ एक्सप्रेस आता पालघर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. यासोबतच दादर ते बिकानेर दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला सुद्धा पालघर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२९५५/२२९५६) आणि दादर-बिकानेर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२४९०/१२४८९) या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
वांद्रे टर्मिनसहून सुटणारी कच्छ एक्स्प्रेस सायंकाळी ७.०० वाजता पालघरला पोहोचणार आहे आणि भुजहून येणारी गाडी सकाळी ९.३४ वाजता पालघर रेल्वे स्थानकावर येईल आणि येथे थांबा घेईल.
तसेच, दादर-बिकानेर एक्स्प्रेस दुपारी ४.१४ वाजता, तर बिकानेर-दादर एक्स्प्रेस सकाळी ११.१२ वाजता पालघरला पोहचणार आहे आणि पालघर रेल्वे स्थानकावर दोन मिनिट थांबेल.
या विशेष गाडीलाही पालघर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर
कच्छ एक्सप्रेस तसेच दादर बिकानेर एक्सप्रेस समवेतच मार्च २०२५ पासून सुरू करण्यात आलेली दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडी सुद्धा आता पालघर मध्ये थांबणार आहे.
दादर–भुसावळ विशेष रेल्वेगाडी (गाडी क्रमांक ०९०५१/०९०५२) पालघर येथे थांबणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडीला पालघर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.