Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईकरांसाठी दोन नवीन रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रलहून राजकोट आणि गांधीधाम दरम्यान विशेष तेजस सुपरफास्ट गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
या विशेष गाड्या विशेष भाड्याने धावणार असून प्रवाशांना गर्दीच्या काळात सुद्धा जलद गतीने प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम या दोन एक्सप्रेस गाड्या रेल्वे कडून सुरू केल्या जाणार आहेत. दरम्यान आज आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे याचा आढावा घेणार आहोत.

मुंबई सेंट्रल – राजकोट विशेष गाडीचे वेळापत्रक
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, मुंबई सेंट्रल-राजकोट दरम्यान ट्रेन क्रमांक ०९००५/०९००६ तेजस सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. या विशेष गाडीच्या मुंबई सेंट्रल ते राजकोट अशा नऊ फेऱ्या होतील आणि राजकोट ते मुंबई सेंट्रल अशा नऊ फेऱ्या होणार आहेत.
म्हणजे या विशेष गाडीच्या १८ फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. ३० मे ते २७ जूनपर्यंत ही विशेष गाडी चालवली जाणार अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. नक्कीच यामुळे मुंबई सेंट्रल ते राजकोट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या गाडीचे वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर मुंबई सेंट्रल राजकोट विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच ट्रेन क्रमांक ०९००५ प्रत्येक बुधवार आणि शुक्रवारी रात्री ११.२० वाजता मुंबई सेंट्रलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता राजकोटला पोहोचणार आहे.
तसेच राजकोट – मुंबई सेंट्रल विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच ट्रेन क्रमांक ०९००६ राजकोटहून प्रत्येक गुरुवार आणि शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता सोडले जाणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.
मुंबई सेंट्रल – गांधीधाम विशेष गाडीचे वेळापत्रक
दुसरी विशेष गाडी म्हणजेच मुंबई सेंट्रल-गांधीधाम दरम्यानची विशेष गाडी अर्थातच ट्रेन क्रमांक ०९०१७/०९०१८ तेजस सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीच्या मुंबई सेंट्रल ते गांधीधाम अशा पाच आणि गांधीधाम ते मुंबई सेंट्रल अशा पाच म्हणजेच एकूण १० फेऱ्या होणार आहेत.
यातील मुंबई सेंट्रल ते गांधीधाम ही विशेष गाडी म्हणजेच ट्रेन क्रमांक ०९०१७ ही गाडी २ जून ते ३० जूनपर्यंत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर सोमवारी रात्री ११.२० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचणार आहे.
तसेच गांधीधाम ते मुंबई सेंट्रल विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच ट्रेन क्रमांक ०९०१८ ही गाडी ३ जून ते १ जुलैपर्यंत चालवली जाईल. या काळात ही गाडी दर मंगळवारी सायंकाळी ६.५५ वाजता गांधीधामहून निघेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.
नक्कीच या गाडीमुळे मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून या विशेष गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.