Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी गणरायाच्या आगमनाआधीच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, जुलै महिना अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणूनच गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे. गणेशभक्त गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि याच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने देखील कंबर कसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन आगामी गणेशोत्सवासाठी सज्ज झाले असून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आणखी काही विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी राजधानी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही एक द्वीसाप्ताहिक गाडी राहणार आहे म्हणजेच या विशेष गाडीच्या आठवड्यातून दोन फेऱ्या होणार आहेत.
तसेच या विशेष गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत आणि यामुळे मुंबई ते कोंकण दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही गाडी फारच उपयुक्त ठरणार आहे.
विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?
मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान चालवली जाणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही विशेष गाडी त्याच दिवशी 22.20 वाजता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
एलटीटी – सावंतवाडी रोड विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. दुसरीकडे सावंतवाडी रोड – एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून 23.20 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार गणपती विशेष गाडी?
सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड दरम्यान चालवल्या जाणाऱ्या गणपती विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील तब्बल 20 महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर आहे.
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्टेशनवर सदर गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.