Mumbai Railway News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क आणि खिशाला परवडणारा प्रवास यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. हेच कारण आहे की रेल्वे कडूनही देशभरात रेल्वेचे जाळे आणखी विस्तारले जात आहे.
रेल्वेचे नेटवर्क वाढावे यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे.

शहरात भूमिगत मेट्रो देखील सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास, सुरक्षित आरामदायी आणि जलद झाला आहे. दरम्यान आता भूमिगत मेट्रो नंतर मुंबईमध्ये भूमिगत रेल्वे देखील धावताना दिसणार असे वृत्त हाती आले आहे.
काय आहेत डिटेल्स
मुंबईकरांना नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पहिल्या भूमिगत मेट्रोची भेट मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे भूमिगत मेट्रोला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दरम्यान आता भूमिगत मेट्रो नंतर रेल्वे सुद्धा जमिनीखालून धावताना दिसणार असून या अनुषंगाने रेल्वे कडून प्रयत्न केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार परळ-करी रोड ते सीएसएमटी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन टाकली जात आहे. दरम्यान हीच रेल्वे लाईन भूमिगत बोगद्यांमधून टाकली जाऊ शकते का याबाबत सध्या रेल्वे कडून विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
जर मुंबई शहरात मेट्रो जमिनीखालून जाऊ शकते मग रेल्वे जमिनीखालून का धावू शकत नाही असे रेल्वेचे म्हणणे आहे. यामुळे जर रेल्वेचा हा विचार प्रत्यक्षात सत्यात उतरला तर मुंबईमध्ये भविष्यात जमिनीखालून रेल्वे धावताना दिसणार आहे आणि यामुळे रेल्वेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडून येईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हा 7.4 किलोमीटर लांबीचा मार्ग जमिनीखालून जाणार?
खरंतर सेंट्रल रेल्वेवर सध्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या पहिला टप्प्याचे म्हणजेच कुर्ला ते परेल हे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान या मार्गीकेचा दुसरा टप्पा हा परेल ते सीएसएमटी असा आहे. हा दुसरा टप्पा जवळपास 7.4 किलोमीटर लांबीचा आहे.
पण दुसऱ्या टप्प्यात रेल्वेला विविध आव्हानांचा सामना करावा लागतोय. यातील सर्वात मोठे आव्हान हे भूसंपादनाचे आहे आणि या प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कसे करायचे हे सुद्धा आव्हान आहे.
दरम्यान याच सर्व गोष्टी विचारात घेऊन आता रेल्वे हा 7.4 किलोमीटर लांबीचा मार्ग जमिनीखालून तयार करू शकते कां यावर विचार करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र जमिनीखालून रेल्वे लाईन टाकण्याचा हा प्रकल्प अगदीच प्रारंभिक अवस्थेत आहे.
सध्या या प्रकल्पावर विचार सुरू आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन आणि मध्य रेल्वे यांनी या प्रकल्पाच्या बाबत काही महत्त्वाच्या बैठकी देखील घेतल्या आहेत. मात्र या भुयारी रेल्वे मार्गाचा अजून आराखडा सुद्धा तयार झालेला नाही. रेल्वे तूर्तास या शक्यतेचा फक्त अभ्यास करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान जर मुंबईतील या पहिल्या भुयारी रेल्वे मार्गाला जर मंजुरी मिळाली तर हा संपूर्ण प्रकल्प 3000 कोटी रुपयांचा राहण्याची शक्यता आहे. यामुळे आता या विचाराधीन भुयारी रेल्वे मार्ग प्रकल्पाला खरंच रेल्वे कडून मंजुरी मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.