Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबईमधील सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना गर्दीच्या काळातही मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रीवा दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अन ही ट्रेन कोण कोणत्या स्थानावर थांबा घेणार याबाबत थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीएसएमटी ते रिवा विशेष एक्सप्रेस ट्रेन 21 मार्च आणि 28 मार्च 2025 रोजी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दोन्ही दिवशी ही गाडी सीएसएमटी येथून दुपारी दीड वाजता सुटणार आहे आणि रिवा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी 20 मार्च आणि 27 मार्च 2025 रोजी रिवा रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दोन्ही दिवशी ही गाडी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी रिवा रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी सीएसएमटीला पोहोचणार आहे.
ही ट्रेन कोण-कोणत्या स्थानकावर थांबणार ?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबईत रीवा दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी राज्यातील जवळपास पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
या रेल्वेगाडीला दादर, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, या राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबतच ही गाडी खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर आणि सतना येथे सुद्धा थांबणार आहे.
या स्पेशल ट्रेनला आणखी एक थांबा मंजूर
दुसरीकडे दादर ते भुसावळ दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला आणखी एक थांबा मंजूर करण्यात आला आहे. 15 मार्चपासून दादर ते भुसावळ ही स्पेशल गाडी सुरू करण्यात आली असून या गाडीला आता पालघर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे पालघर मधील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.