Mumbai Railway News : मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रातील बाबा महाकालच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बाबा महाकालच्या श्रीक्षेत्र उज्जैन नगरीला जाणाऱ्या भक्तांसाठी राजधानी मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे जर तुम्हीही मुंबईत राहत असाल आणि बाबा महाकालचा दर्शनासाठी या श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र उज्जैन नगरीला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अगदीच खास ठरणार आहे.
खरे तर आज पासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि या श्रावण महिन्यात देशभरातील सर्वच ज्योतिर्लिंगावर शिवभक्तांची मोठी मांदीयाळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान याच श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मुंबई ते इंदोर दरम्यान विशेष तेजस एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही विशेष गाडी 23 जुलैपासून सुरु झाली आहे. 23 जुलै ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत चालवली जाणार असून आता आपण याच विशेष तेजस एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याबाबतची डिटेल माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार तेजस एक्सप्रेस
पश्चिम रेल्वेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे कडून मुंबई ते इंदोर दरम्यान चालवली जाणारी ही तेजस स्पेशल एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. म्हणजेच ही तेजस एक्सप्रेस त्रिसाप्ताहिक राहणार असून यामुळे मुंबई ते इंदोर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र उज्जैन येथे बाबा महाकालच्या दर्शनाला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी ही गाडी विशेष फायद्याची ठरणार आहे. ही गाडी इंदोर जंक्शन वरून मंगळवार गुरुवार आणि शनिवारी सोडले जाणार आहे आणि राजधानी मुंबई येथील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून ही गाडी रविवार बुधवार आणि शुक्रवारी सोडली जाणार आहे.
812 किलोमीटर लांबीच्या या मुंबई ते इंदोर मार्गावर तेजस एक्सप्रेस चालवली जाणार असल्याने मुंबई ते इंदोर दरम्यान चा प्रवास 14 तास आणि दहा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक जाणून घेऊयात.
कसे राहणार विशेष तेजस एक्सप्रेसचे वेळापत्रक
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून विशेष तेजस एक्सप्रेस ट्रेन 23 जुलै ते 30 ऑगस्ट या काळात चालवली जाईल. या कालावधीत ही गाडी आठवड्यातील रविवार, बुधवार आणि शुक्रवारी हे 3 दिवस मुंबई सेंट्रल येथून 11 वाजून वीस मिनिटांनी इंदोरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक वाजता ही गाडी इंदोरला पोहोचणार आहे.
तसेच ही गाडी परतीच्या प्रवासात मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी इंदोर जंक्शन येथून सायंकाळी पाच वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
विशेष गाडीचे थांबे आणि तिकीट दर
तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर मुंबई ते इंदोर दरम्यान चालवली जाणारी तेजस सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस ट्रेन चे 3AC चे तिकीट 1805 रुपये इतके असणार आहे. 2एसी टियरचे भाडे 2430 रुपये आणि फर्स्ट एसीचे भाडे 3800 रुपये इतकी असेल अशी माहिती पश्चिम रेल्वे कडून समोर आली आहे.
ही विशेष गाडी या मार्गावरील बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, दाहोद, रतलाम आणि उज्जैन या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. म्हणजेच मुंबई आणि गुजरात मधील प्रवाशांसाठी ही गाडी अधिक फायद्याची राहील.