Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांसाठी लवकरच एका नव्या पॅसेंजर ट्रेन ची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यामुळे मुंबईहून उत्तर महाराष्ट्राकडील प्रवास वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते भुसावळ अशी पॅसेंजर ट्रेन चालवली जात होती मात्र ही ट्रेन गेल्या काही महिन्यांपासून रद्द झाली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ–मुंबई मार्गावर सध्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पण तरीही कोरोनापूर्वी सुरू असणारी भुसावळ – मुंबई पॅसेंजर ट्रेन सुरू होण्याची मागणी कायम आहे.
मुंबई – भुसावळ पॅसेंजर ट्रेन कोरोना काळात रद्द करण्यात आली होती, मात्र आता या ट्रेनच संचालन पुन्हा सुरू झाले पाहिजे अशी आग्रही मागणी उपस्थित होत आहे. पॅसेंजर ट्रेन रद्द झाली असल्याने या मार्गावरील लहान स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.
यामुळे या गाडीला पुन्हा हिरवा झेंडा मिळावा अशी आग्रही मागणी आहे आणि लवकरच रेल्वे प्रशासन या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार अशी अपेक्षा सुद्धा आहे.
भुसावळहून मुंबईकडे रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. मात्र, यापैकी बहुतांश गाड्या लहान स्थानकांवर थांबत नसल्याने भुसावळ–जळगाव परिसरातील प्रवाशांना मोठ्या स्थानकांवर जाण्याची वेळ येते.
इतकेच नव्हे तर एक्स्प्रेस गाड्या आधीच खच्चून भरलेल्या असल्याने प्रवाशांना सहा ते सात तासांचा प्रवास उभ्याने करावा लागत असल्याची तक्रारही वाढली आहे. करोना काळापूर्वी भुसावळ–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान ५११५३/५११५४ ही पॅसेंजर गाडी धावत होती. भुसावळहून सकाळी ७.०५ वाजता सुटणारी ही गाडी एकूण ४७ स्थानकांवर थांबत असे.
भादली, जळगाव, शिरसोली, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, टिटवाळा, कल्याण ते दादर अशा अनेक स्थानकांवरून प्रवाशांना स्वस्तात आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होती.
या पॅसेंजर गाडीचा वेग जेमतेम ३७ किमी प्रतितास असल्याने मुंबईपर्यंत पोहोचायला तब्बल १२ तास लागत, तर मेल–एक्स्प्रेस गाड्या साधारण सात तासांत मार्ग पार करतात.
तरीही, फक्त ७० ते ८० रुपयांत मिळणारा प्रवास आणि प्रत्येक स्टेशनवर थांबा या दोन कारणांमुळे सामान्य प्रवाशांसाठी ही गाडी जीवनवाहिनी ठरली होती. करोना काळात प्रवासी वाहतूक बंद झाल्यानंतर ही गाडी सेवा थांबविण्यात आली आणि आजतागायत ती पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. प्रवाशांनी अनेकदा मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी याबाबत ठोस पाठपुरावा न केल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, जळगाव–मनमाड तिसऱ्या मार्गाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर भुसावळ–मुंबई मार्गावर मेमू किंवा पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. लहान स्थानकांवरील प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.













