Mumbai ST Bus News : होळीचा सण जसाजसा जवळ येतोय तशी या सणाची धूम देखील वाढत आहे. कोकणात होळी सणाची आतापासूनच दोन सुरू झाली आहे. कोकणात शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यंदाही हा सण तेवढ्याचं उत्साहात आणि थाटात संपन्न होत आहे. अनेक जण होळीच्या सणासाठी आपल्या मूळ गावी परतत आहेत.
त्यामुळे सध्या रेल्वे गाड्यांमध्ये आणि एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. अशातच मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांसाठी एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी महामंडळाने मुंबई अन ठाण्यातून जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एस टी महामंडळ दरवर्षी असा निर्णय घेते आणि यंदाही एसटी महामंडळाकडून मुंबई आणि ठाण्यातून 195 जादा एसटी गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाकडून समोर आली आहे.
यामुळे सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लाल परी च्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण एसटी महामंडळाकडून मुंबई आणि ठाण्यातून कोणत्या शहरांसाठी जादा गाड्या चालवल्या जात आहेत? या गाड्या कधीपर्यंत सुरू राहणार? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत डिटेल्स?
एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, होळी शिमगोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोमवारपासून जादा गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आणखी पाच दिवस या गाड्या सुरू राहणार आहेत.
17 मार्च 2025 पर्यंत जादा गाड्या प्रवाशी सेवेत राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महामंडळाकडून ग्रुप-95 आणि आरक्षण-97 अशा एकूण 195 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोणत्या मार्गावर धावणार जादा बसेस
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर जिह्यांतून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. गुहागर, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे या भागांत जादा एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी गाडय़ा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सुद्धा एसटी महामंडळाने सांगितले आहे. नक्कीच एसटी महामंडळाच्या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे आणि या निर्णयाचे प्रवासी संघटनांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.