Mumbai To Nashik : मुंबई ते नाशिक असा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर आगामी काळात मुंबई ते नाशिक हा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाचे शहरे आहेत. मात्र सध्या स्थितीला नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
रस्त्यांवर असणारी वाहनांची वर्दळ, खराब होत चाललेले रस्ते आणि वाहतूक कोंडी यासारख्या असंख्य संकटांमुळे मुंबई नाशिक प्रवास हा आव्हानात्मक बनलेला आहे. पण आता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आलाय आणि यामुळे नाशिक ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर सुद्धा मोठे समाधानाचे भाव पाहायला मिळतायेत.

खरेतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेने खुला होणार असे वृत्त हाती आले आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या महामार्गाचा ६२५ किमीचा टप्पा सध्या कार्यान्वित आहे. सध्या स्थितीला नागपूर ते इगतपुरी हा समृद्धी महामार्गाचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे आणि लवकरच इगतपुरी ते आमने हा बाकी राहिलेला टप्पा देखील वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात इगतपुरी ते आमने (ठाणे) हा ७६ किमीचा टप्पा वाहतूकीसाठी सुरू होणार असून, यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास गतिमान होणार अशी शक्यता आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर नाशिक ते मुंबई हा प्रवास अवघ्या अडीच तासांत पार होईल अशी शक्यता आहे.
कधी होणार लोकार्पण ?
मीडिया रिपोर्टनुसार समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. एक मे २०२५ रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाचा संपूर्ण लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्यात एकूण पाच बोगदे असून त्यांची एकत्रित लांबी ११ किमी आहे.
यातील ७.८ किमी लांबीचा बोगदा देशातील सर्वात लांब व रुंद बोगदा म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान, या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हा प्रवास अवघ्या आठ मिनिटांत पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार असून, महाराष्ट्रातील पश्चिम भागासाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे.