Mumbai To Pune Travel : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते पुणे आणि दिल्ली ते मुंबई हा प्रवास आता लवकरच वेगवान होणार आहे. सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते पुणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास साडेतीन ते चार तासांचा वेळ लागतोय. त्याचवेळी मुंबई ते दिल्ली हा प्रवास रस्ते मार्गाने पूर्ण करायचे म्हटले की 24 तासांचा वेळ लागतो.
मात्र आता या शहरांमधील प्रवास वेगवान होणार आहे. कारण की लवकरच देशात आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची हायपरलूप ट्रेन धावताना दिसणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना विमानापेक्षा ही वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. विमानापेक्षाही जलद गतीने ट्रेनचा प्रवास म्हणजे दिवा स्वप्नचं. पण आता हे दिवास्वप्न पूर्ण होणार अशी आशा आहे.

कारण की भारतात आता हायपरलूप ट्रेन सुरू होणार आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी मोठी माहिती दिली. आयआयटी मद्रास मध्ये सुरू असणाऱ्या हायपरलूप ट्रेनच्या प्रकल्पाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी निरीक्षण केले आणि यावेळी त्यांनी याबाबत मोठी माहिती दिली.
काय म्हटलेत अश्विनी वैष्णव
केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय प्रौद्योगिक संस्था म्हणजे आयआयटी मद्रासमध्ये विकसित होणारी हायपरलूप आशियातील सर्वाधीक लांबीची हायपरलूप ट्यूब असणार आहे. या प्रकल्पाची लांबी 410 मीटर असून लवकरच हा प्रकल्प जगातील सर्वाधीक लांबीचा हायपरलूप प्रकल्प असणार आहे.
हायपरलूप प्रकल्पासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक चेन्नईतील इंटीग्रेल कोच फॅक्ट्रीत तयार केले जात आहेत. हायपरलूप ट्रेन बाबत बोलायचं झालं तर ही एक हाय-स्पीड ट्रेन आहे जी जवळजवळ रिकाम्या (व्हॅक्यूम) ट्यूबमध्ये धावते.
ट्यूबमधील हवेचा दाब खूप कमी असल्याने त्याचे कॅप्सूल (ज्यामध्ये प्रवासी बसतात) ताशी 1,000 किलोमीटरपेक्षा जास्त वेग गाठू शकते. हायपरलूप प्रकल्प अंतर्गत विकसित होणाऱ्या ट्यूबच्या आत हवा नसल्या कारणामुळं फ्रिक्शन खूप कमी होते.
यामुळं कॅप्सूल हवेत तरंगत असल्याप्रमाणे, अगदी कमी उर्जेचा वापर करून खूप जास्त वेगाने फिरू शकते. त्यामुळं त्याचा वेग ताशी 1000 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. काही मीडिया रिपोर्ट मध्ये या ट्रेनचा वेग 1200 किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो असाही दावा केला जातो. म्हणजे जगातील ही सर्वाधिक वेगाची ट्रेन ठरणार आहे.
दरम्यान, मे 2022 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने आयआयटी मद्रासला भारतात हायपरलूप प्रणाली आणि त्याचे घटक तयार करण्यासाठी 8.34 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. यामुळे ताशी 1000 ते बाराशे किलोमीटर वेगाने धावणारी ही ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पुणे यादरम्याचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.