Mumbai Vande Bharat Railway : महाराष्ट्राला आतापर्यंत बारा जोडी वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. दरम्यान आता हे नेटवर्क आणखी वाढणार आहे. खरे तर अलीकडेच प्रसार माध्यमांमध्ये पुणे ते नांदेड या मार्गावरून ते भारत ट्रेन सुरू होणार असल्याचा दावा करण्यात आला.
रेल्वे बोर्डाने पुणे – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ला मंजुरी दिली असून डिसेंबर अखेरपर्यंत ही गाडी रुळावर धावण्याची शक्यता आहे. अशातच आता मराठवाड्यातील आणखी एका शहराला वंदे भारतची भेट मिळणार असे वृत्त हाती आले आहे.

खरंतर छत्रपती संभाजी नगर शहरातून मुंबईसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मुंबई – जालना वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड पर्यंत विस्तारित झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रवाशांनी या निर्णयाविरोधात जोरदार आवाज उठवला.
यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संभाजीनगर साठी आम्ही स्पेशल वंदे भारत सुरू करू अशी ग्वाही दिली होती. अश्विनी वैष्णव यांनी ऑगस्ट महिन्यात ही ग्वाही दिली होती. त्यावेळी अश्विनी वैष्णव यांनी “आगामी तीन महिन्यांत मुंबई – छत्रपती संभाजी नगर दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू करू,” असा ठोस शब्द दिला होता.
पण नोव्हेंबरचा अर्धा महिना उलटून गेला, तरीही या नव्या गाडीबाबत कोणताही निर्णय किंवा हालचाल न दिसल्याने प्रवाशांत नाराजीचा सुर अधिक तीव्र होत आहे. याचदरम्यान नांदेडकडे विस्तारीत केलेली जालना–मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरपासून पुढे मोठ्या प्रमाणात रिकाम्या डब्यांसह धावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेळापत्रकातील बदलामुळे मुंबई प्रवाशांना मोठी गैरसोय होत असून, सकाळच्या सत्रातील सोयीस्कर गाडीची शहराला नितांत गरज असल्याचे चित्र स्पष्ट आहे. दरम्यान, शहरातून स्वतंत्र वंदे भारत मागणीसाठी खासदार डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन “ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक” करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती दिली होती.
मात्र फिजिबिलिटी तपासणीसह पुढील प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने उलट्या गणनेत तीन महिने संपत आले तरीही निर्णयाचा ‘शून्य’ परिणामच दिसत आहे. मराठवाड्यातील राजकीय कुरघोडी, परस्परांतील सहमतीचा अभाव आणि प्रांताच्या विकासाकडे दुर्लक्ष या मुद्द्यांमुळे सामान्य प्रवाशांची होणारी यातायात वाढत चालल्याची भावना नागरिकांत वाढते आहे.
“छत्रपती संभाजीनगरची वाढती लोकसंख्या आणि मुंबईशी असलेली दैनंदिन कामकाजाची नाळ पाहता सकाळच्या वेळी स्वतंत्र वंदे भारत ही वेळेची गरज बनली आहे,” असे प्रवाशांचे मत आहे.
पीटलाइनचे कामही प्रलंबित
शहरातील पीटलाइनचे काम अद्याप अपूर्ण असून, नवीन वंदे भारत गाडीसाठी ते अत्यावश्यक असल्याचे खासदार कराड यांनी स्पष्ट केले. “या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची लवकरच पुन्हा भेट घेणार आहोत,” असे ते म्हणाले.
प्रवाशांच्या अपेक्षा, शहराची वाहतूक क्षमता आणि रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन या तिन्ही गोष्टींच्या संगमावर आता निर्णयाची प्रतीक्षा अधिकच तीव्र झाली आहे. येत्या काही दिवसांत रेल्वे मंत्रालयाकडून ठोस घोषणा न झाल्यास प्रवाशांमध्ये असंतोषाची लाट अधिक वाढण्याची शक्यता आहे.













