Mumbai Vande Bharat Railway : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. खरे तर सध्या मुंबईहून सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चार वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई येथील मुंबई सेंट्रल येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस अशा एकूणच सहा वंदे भारत एक्सप्रेस सध्या राजधानी मुंबईवरून धावत असून या वंदे भारत एक्सप्रेस ला मुंबईकरांच्या माध्यमातून अद्भुत प्रतिसाद सुद्धा दाखवला जातोय.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थातच सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

दरम्यान या सहापैकी सीएसएमटी ते मडगाव म्हणजेच मुंबई ते गोवा या वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात लवकरच मोठा बदल अपेक्षित आहे. 15 जून 2025 पासून हा नवा बदल लागू होणार असून दरम्यान आता आपण या वंदे भारतच्या वेळापत्रकात कोणता बदल झाला आहे आणि याचे कारण काय या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात काय बदल झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस 16 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत आठवड्यात 6 दिवसांऐवजी फक्त तीन दिवस धावणार आहे. या कालावधीत गोवा ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस फक्त सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावेल.
दुसरीकडे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस 17 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान आठवड्यातून सहा ऐवजी तीन दिवस चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.
वास्तविक, दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी काळात मान्सून वेळापत्रक लागू केले जाते. या अंतर्गत रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा येते. पावसाळी काळात काही अप्रिय घटना घडू नये यासाठी कोकण रेल्वे पावसाळी काळात पावसाळी वेळापत्रक लागू करत असते.
पावसाळी वेळापत्रकाच्या काळात ठोकूर ते रोहा दरम्यान रेल्वे गाड्या 120 किलोमीटर प्रतितास या ऐवजी फक्त 75 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावतात. महत्त्वाचे म्हणजे मुसळधार पाऊस झाल्यानंतर हा वेग 40 किलोमीटर प्रतितास पर्यंत कमी केला जातो. हे पावसाळी वेळापत्रक दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू राहते.
यंदा मात्र 15 जून पासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे आणि 31 ऑक्टोबर ऐवजी 20 ऑक्टोबर पर्यंत हे वेळापत्रक लागू राहील. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाते. याच पार्श्वभूमीवर मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.