Mumbai Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर दिसणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. मुंबई शहराला देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे.
दरम्यान आज आपण मुंबईहून कोणत्या शहरासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळुरू ते मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करण्याची शक्यता आहे.

खरे तर, या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मंगळुरू ते मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू व्हावी यासाठी उडुपी-चिकमंगळूरचे खासदार कोटा श्रीनिवास पूजारी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे.
या मार्गावर रेल्वेसेवा वर्षभर तुडुंब भरलेल्या असतात, त्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. खासदार पूजारी यांनी आपल्या पत्रात मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस गाडी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद होण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मात्र, मंगळुरू आणि उडुपी ही पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाची शैक्षणिक, पर्यटन आणि धार्मिक केंद्रे असल्यामुळे अशा प्रीमियम रेल्वे सेवांची आवश्यकता आहे. ही सेवा बंद करण्याऐवजी तिला मुंबईपर्यंत विस्तारित करावे, असा त्यांचा प्रस्ताव आहे.
खरे तर सध्या देशात चेअर कार प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे मात्र दूरवरचा प्रवास करण्यासाठी या गाड्या अनुकूल नाहीत. यामुळे आता रेल्वेच्या माध्यमातून शयनयान प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमधून धावताना आपल्याला दिसेल आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुरक्षित अन सुपरफास्ट होणार आहे. सध्या सुरु वंदे भारत चेअरकार ट्रेन महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद,, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.