ब्रेकिंग: पुणे अहिल्यानगर मार्गावर ५४ किलोमीटरचा उड्डाणपूल अन् मेट्रो मार्ग तयार होणार, कसा असणार संपूर्ण प्रकल्प?

Published on -

Nagar News : अहिल्यानगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे ते शिरूरदरम्यान सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडून (एमएसआयडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले असून, त्यामुळे या मार्गावरील महामेट्रोच्या रामवाडी–वाघोली ११.६३ किलोमीटर मेट्रो मार्गिकेच्या दुहेरी उड्डाणपुलालाही गती मिळणार आहे.

पुणे शहरातून अहिल्यानगरकडे जाणारा हा महामार्ग येरवडा, रामवाडी, चंदनगर, खराडी, वाघोली, केसनंद, तुळापूर फाटा, शिक्रापूर, रांजणगाव ते शिरूर असा अत्यंत वर्दळीचा पट्टा आहे. विशेषतः येरवडा ते खराडी हा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो, तर पुढील मार्ग राज्य महामार्गात मोडतो.

या संपूर्ण मार्गावर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयटी पार्क्स, सरकारी कार्यालये, वाहन शोरूम्स, पंचतारांकित हॉटेल्स तसेच विविध खासगी कंपन्यांची कार्यालये असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.

हा मार्ग शहराच्या उत्तरेकडून ईशान्येकडे जाणारा प्रमुख दुवा असल्यामुळे अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. परिणामी, रोजच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो.

ही समस्या लक्षात घेऊन या महामार्गावर उन्नत सहापदरी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याचबरोबर रामवाडी ते वाघोलीदरम्यान मेट्रो मार्गिकेला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.

हा मार्ग दोन प्रशासकीय हद्दीत येत असल्याने काम कोणत्या यंत्रणेकडून करायचे, याबाबत संभ्रम होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यापैकी कोण ही जबाबदारी घेणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.

अखेर राज्य सरकारने हा प्रकल्प एमएसआयडीसीकडे देण्याचा निर्णय घेतला असून ‘डिझाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर’ (डीबीएफओटी) तत्त्वावर तो राबवला जाणार आहे.

दरम्यान, एनएचएआय आणि एमएसआयडीसी यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला असून डीपीआरचे काम सुरू झाले आहे.

या निर्णयामुळे पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच महामेट्रोच्या प्रकल्पालाही मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News