आयुक्तांचा चक्रावून टाकणारा निर्णय; वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला सक्तीची रजा अन असमाधानकारक कामाचा ठपका मिळालेल्या अधिकाऱ्याला दिली ‘ही’ जबाबदारी

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या रँकिंगनुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा महत्त्वाचा उद्देश यामागे आहे. महत्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होत असते. मात्र अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना सदर रँकिंग घसरल्याने थेट सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

Tejas B Shelar
Published:
Nagar News

Nagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकताच एक अजब आणि सर्वांना चकित करणारा निर्णय घेतलाय. त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार दिल्या जाणाऱ्या मासिक रँकिंगला साधन बनवत विभाग प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना सक्तीची रजा दिली आहे.

तर ज्या अधिकाऱ्यावर असमाधानकारक कामाचा ठपका ठेवण्यात आला होता, असमाधानकारक कामामुळे ज्यांना नोटीस देण्यात आली होती त्या अधिकाऱ्याला आरोग्य विभाग प्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. खरेतर, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही जी रँकिंग दिली जाते ती कोणतीच स्पर्धा नाहीये. तर सदर निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन करता यावे एवढाच फक्त या रँकिंगचा उद्देश्य असल्याचे समजते.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या रँकिंगनुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा महत्त्वाचा उद्देश यामागे आहे. महत्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होत असते. मात्र अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना सदर रँकिंग घसरल्याने थेट सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

या कारवाईमुळे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरलेली आहे. आरोग्य सेवा रँकिंग ही केवळ शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेली एक प्रणाली आहे. यात कुठेही रँकिंग घसरली म्हणून अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अथवा सक्तीच्या रजेवर पाठवावे असे नमूद करण्यात आलेले नाही. मात्र असे असतानाही डॉ. बोरगे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.

म्हणून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच या कारवाई विरोधात नाराजी सुद्धा व्यक्त होताना दिसते. तसेच जवळपास 80 कर्मचाऱ्यांनी आयुक्त डांगे यांना रँकिंगचा ठपका ठेवून कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये असे निवेदन सुद्धा दिले आहे. पूर्ण क्षमतेने काम करूनही आमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे अयोग्य आहे अशी भावना कर्मचाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली. म्हणून आता आयुक्त डांगे आपल्या या कारवाईवर पुनर्विचार करणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

दरम्यान, आयुक्त डांगे यांनी डॉक्टर बोरगे यांना सक्तीची रजा देऊन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांना विभागप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी दिलेली आहे. खरंतर, डॉ. अनिल बोरगे यांनी विभाग प्रमुख म्हणून ऑगस्ट 2024 मध्येच मनपातील 17 केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते.

शासनाच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील विविध भागात 18 आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये महिला आरोग्य, फॅमिली प्लानिंग, लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा सक्षमरितीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असताना त्यांनी कामात कसूर केल्याने याआधीही मनपाचे रँकिंग घसरले होते. त्यावेळी बोरगे यांनी तत्कालिन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिश राजूरकर यांनाही नोटिस बजावून आरोग्य कार्यक्रमाचे काम असमाधानकारक असल्याचे म्हटले होते.

पण घसरलेल्या रँकिंगचे कारण देऊन डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीची रजा देण्यात आली आणि ज्यांना असमाधानकारक कामाबद्दल नोटीस बजावण्यात आली होती त्या डॉ. राजुरकर यांनाचं विभाग प्रमुखांची जबाबदारी दिली. यामुळे आयुक्तांचा हा निर्णय सध्या महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe