Nagpur Goa Shaktipeeth Expressway : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची आतुरता होती ती आतुरता काल संपली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
काल, भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही मात्र येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर नव्या सरकारची पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.
या बैठकीनंतर राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुढील पाच वर्षांचा रोड मॅप कसा राहणार? कोणते प्रकल्प मार्गी लागणार? यासंदर्भात डिटेल माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पीसीचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री महोदय यांना नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. हा महामार्ग प्रकल्प होणार की रद्द केला जाणार? याबाबत फडणवीस यांनी मोठी माहिती दिली.
काय म्हणालेत CM?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, शक्तिपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्ण समर्थन आहे. या भागापर्यंत बाधित शेतकरी स्वतः भूसंपादन करा असे म्हणत आहेत. पण, कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो, तिथे खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे.
त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आमचा असा प्रयत्न असेल की, ज्या भागापर्यंत विरोध नाही. तिथपर्यंतची अलाइनमेंट पूर्ण करायची आणि पुढचे काम जे आहे, ते सगळ्यांशी चर्चा करून पुढे न्यायचे. शेतकऱ्यांना नाराज करून, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्ट केले आहे.
काही पर्यायी रस्ते तयार करता येतील का किंवा आता जो महामार्ग आहे, त्याला शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा एखादा उन्नत मार्ग बांधून त्यातून पर्याय काढता येईल का, असा चर्चेतून मार्ग काढू.
समृद्धी महामार्गामुळे म्हणजेच नागपुर-मुंबई प्रवेश नियंत्रित महामार्गामुळे ज्याप्रमाणे विदर्भाचे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे चित्र बदलले आहे त्याच धर्तीवर संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग आवश्यक असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठवाड्याचे चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग मोठी भूमिका निभावणार असून याच कारणासाठी माझा या महामार्गासाठी आग्रह असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.