Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते.
डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते वितरित झाले असून महिन्यापूर्वीच २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र, राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा आठवा हप्ता अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. केंद्राच्या योजनेत पात्र ठरणारेच शेतकरी या योजनेचेही लाभार्थी आहेत. राज्याकडूनही वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात.
बहुतांशी वेळा केंद्र आणि राज्याचे हप्ते एकाच वेळी किंवा आसपास मिळतात; मात्र यंदा ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यानचा राज्याचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बँकांमध्ये चौकशीसाठी हेलपाटे मारत आहेत.
दरम्यान, राज्य शासनाच्या आठव्या हप्त्याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मार्चपूर्वी नववा हप्ता मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे, कारण सध्या शेतीसाठी लागणारा खर्च वाढलेला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य शासनाने केंद्र व राज्य मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार राज्याकडून अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत; मात्र ही वाढीव रक्कम कधी मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, केंद्र व राज्य दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याने किंवा आधार प्रमाणीकरणात त्रुटी असल्याने त्यांचे हप्ते अडले आहेत. त्यामुळे शासनाने यासंदर्भात अधिक व्यापक जनजागृती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.













