नाशिक- नाशिक आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या दोन शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा तब्बल एक तास वाचणार आहे.
या बदलाचे कारण आहे नाशिक-मुंबई मार्गावर उभारण्यात येणारी नवीन समांतर रेल्वे लाईन. ही लाईन प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच रेल्वे सेवेची कार्यक्षमता वाढवेल आणि प्रवाशांना सुधारित अनुभव देईल.

चार नवीन स्थानके उभारले जाणार
प्रस्तावित योजनेनुसार, कसारा घाट ते मनमाड या सुमारे 140 किलोमीटरच्या अंतरावर ही नवीन रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. या मार्गावर नवीन नाशिकरोड, नवीन पाडळी, वैतरणानगर आणि चिंचलखैरे अशी चार नवीन स्थानके उभारली जातील. या स्थानकांमुळे स्थानिक प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि या भागातील प्रवास सुलभ होईल. नव्या मार्गामुळे नाशिक आणि मुंबईदरम्यानच्या रेल्वे सेवांना गती मिळेल, तसेच प्रवासादरम्यान येणारे अडथळे कमी होतील.
१२ बोगद्यांचा समावेश
या नव्या रेल्वे लाईनमध्ये 12 बोगद्यांचा समावेश असेल, जे कसारा घाटातील चढ कमी करण्यास मदत करतील. यामुळे रेल्वेच्या इंधन खर्चात बचत होईल आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फायदा होईल. विशेष म्हणजे, या मार्गावर रेल्वे विना बँकर इंजिन धावू शकेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्या नाशिक-मुंबई रेल्वे प्रवासाला लागणारा वेळ या नव्या लाईनमुळे एका तासाने कमी होईल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक कार्यक्षम आणि जलद पर्याय उपलब्ध होईल.
चार हजार कोंटीचा खर्च
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चाचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर नाशिक आणि मुंबईदरम्यानच्या व्यापारी आणि सामाजिक संबंधांना चालना मिळेल.
नव्या स्थानकांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल, कारण अधिक प्रवासी आणि मालवाहतूक यामुळे या भागातील उद्योग आणि व्यवसायांना फायदा होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नाशिक-मुंबई रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी अधिक विश्वासार्ह आणि आधुनिक पर्याय ठरेल, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल.