Nashik News : द्वारका चौक परिसरात प्रस्तावित भुयारी मार्गाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होत असल्याने येत्या काही दिवसांत या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी बसगाड्यांच्या मार्गात आणि बसस्थानकांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.
त्यानुसार रविवार (ता. १) पासून धुळे, पेठ, सप्तशृंगगड तसेच छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटी बसगाड्या निमाणी बसस्थानकावरून उपलब्ध होतील.

द्वारका चौक हे शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून येथूनच जिल्हांतर्गत व जिल्हाबाहेरील अनेक एसटी बसगाड्या मार्गस्थ होत असतात. भुयारी मार्गाच्या विकासकामामुळे या परिसरात वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे द्वारका चौकातील बसथांबा तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार असून, यापुढे द्वारकावरून बस उपलब्ध होणार नाही. प्रवाशांना थेट संबंधित बसस्थानक गाठावे लागणार आहे.
महामंडळाने केलेल्या फेरनियोजनानुसार निमाणी बसस्थानकावर प्रवासी वाहतुकीचा मोठा भार असणार आहे. धुळे, पेठ, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक तसेच कळवण, सप्तशृंगगड, सुरगाणा, गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या सुरत, वापी, बलसाड, इंदूर आदी फेऱ्या निमाणी येथून चालविल्या जातील.
याशिवाय मालेगाव, मनमाड, जळगाव, नंदुरबार, साक्री, सटाणा, शहादा तसेच येवला, लासलगाव, जालना, बुलडाणा व लोणार मार्गावरील बसगाड्याही याच बसस्थानकावरून सुटतील.
मुंबई व जळगाव-धुळे मार्गावरील बसगाड्यांबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे. या फेऱ्या महामार्ग बसस्थानकावरूनच प्रवासी चढ-उतार करून मुंबई नाका सर्कल, लेखानगर, राणे नगर मार्गे पुढे जातील. मात्र या बसेस निमाणी बसस्थानकात येणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या फेऱ्या मेळा बसस्थानकावरून, तर त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी, गिरणारे, हरसूल व ओझरखेड परिसरातील ग्रामीण फेऱ्या नवीन बसस्थानकावरून चालविल्या जातील. प्रवाशांनी प्रवासापूर्वी बदललेल्या बसस्थानकांची माहिती घेऊनच नियोजन करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.













