New Rules : फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा दिवस एकाच तारखेला आल्याने सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपासून ते पान मसाल्यावरील कर, फास्टॅग नियम आणि बँकांच्या सुट्ट्यांपर्यंत या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चावर होणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जसे होते तसेच, १ फेब्रुवारी २०२६ रोजी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करणार आहेत. बजेटच्या दिवशीच हे दर जाहीर होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. विशेषतः १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याआधी १ जानेवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ₹१४.५० ने घट करण्यात आली होती, ज्यामुळे दिल्लीत त्याची किंमत ₹१८०४ झाली होती. आता घरगुती ग्राहकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एलपीजीप्रमाणेच १ फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन फ्युएल (ATF) चे नवीन दरही लागू होतील. एटीएफच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम विमान भाड्यावर होतो. गेल्या महिन्यात दिल्लीत एटीएफच्या किमती सुमारे ७ टक्क्यांनी कमी झाल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
तसेच सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल होण्याची शक्यता असून, याचा परिणाम वाहन खर्च आणि घरगुती गॅस बजेटवर होऊ शकतो.
दरम्यान, सरकारने तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाल्यावरील कर रचनेत मोठा बदल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता जीएसटी व्यतिरिक्त उत्पादन शुल्क तसेच आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर (सेस) आकारला जाणार आहे.
जीएसटी भरपाई उपकराच्या जागी हा नवीन कर लागू करण्यात आल्याने सिगारेट आणि पान मसाल्याच्या किमती लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.
वाहनधारकांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. एनएचएआयने १ फेब्रुवारीपासून कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्टॅग काढताना केवायसी पडताळणीची अट रद्द केली आहे. यामुळे नवीन फास्टॅग मिळवणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
याशिवाय, फेब्रुवारी महिन्यात बँकिंग कामे करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, आठवड्याच्या सुट्ट्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसारख्या स्थानिक सणांमुळे फेब्रुवारीत बँका एकूण १० दिवस बंद राहतील. त्यामुळे आवश्यक बँकिंग व्यवहार वेळेपूर्वी पूर्ण करणे किंवा डिजिटल बँकिंगचा वापर करणे हितावह ठरणार आहे.













